मुंबई -: औषध निर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण असून या क्षेत्रात गुंतवणूक करु इच्छिणा-यांनी महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
    ‘आयफेक्स-2013’ या पहिल्या फार्मा आणि हेल्थकेअर आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे मुख्यमंत्री श्री.चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
    यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि औद्योगिक विभागाचे अतिरिक्त सचिव राजीव खेर, अन्न व औषधे प्रशासन आयुक्त महेश झगडे, डॉ.जी.एन.सिंग, डॉ.पी.व्ही.अप्पाजी, भाविन मेहता उपस्थित होते.
    मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण नुकतेच जाहीर झाले असून या धोरणाअंतर्गत गुंतवणुकदारांना मुबलक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. औषध उत्पादनाच्या क्षेत्रात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून सध्या राज्यातून मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात होत आहे. या क्षेत्रात नाविण्यता, वाजवी किंमत व उच्च गुणवत्ता यांना विशेष महत्त्व असून निर्यात वाढीसाठी या गोष्टींना प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच राज्यात उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्था असून या क्षेत्रासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. येथील मनुष्यबळाचा वापर गुंतवणुकदारांनी करुन घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
    या प्रदर्शनात 250 प्रदर्शक सहभागी झाले असून प्रदर्शनासाठी 104 देशातील 500 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला आहे.
 
Top