उस्मानाबाद -: घरकुलांची कामे वेळेत मार्गी लावा आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्या, तसेच राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात बँकानीही सकारात्मक भूमिका घेऊन बचत गटाची प्रकरणे वेळेवर मार्गी लागतील हे पहावे, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिले.
      येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियामक मंडळाची सर्वोच्च सभा पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, आमदार राहूल मोटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, महिला व बालकल्याण सभापती सविता कोरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.केशव सांगळे यांच्यासह आठही तालुक्यांचे पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी व विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
     पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी राज्य ग्रामीण  जीवनोन्नती अभियानात मार्च -2013 अखेर झालेल्या आर्थीक कामाचा आढावा घेतला. केंद्र व राज्य शासनाकडून 3 कोटी 39 लाख रुपये निधी यासाठी प्राप्त झाला. त्यापैकी 2 कोटी 75 लाख रुपये खर्च करण्यात आले. मुलभूत सुविधांसाठी असलेला निधीही खर्च व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बँकानेही बचत गटाची प्रकरणे मंजूर करण्याबाबत सकारात्मक भूमिका बजावावी, असे ते म्हणाले.
     इंदिरा आवास योजनेतंर्गत सन 2012-13 या वर्षाचा आढावा त्यांनी घेतला. या योजनेसाठी जिल्ह्यात 38 कोटी रुपये उपयोगात आणले गेले ही बाब आहे. मात्र तालुका व ग्राम स्तरावर सर्वसामान्य घटकांना घरकुल मिळविताना अडचण येऊ नये, या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले. सन 2013-14 साठीचा वार्षीक कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यात 3 हजार 342 इतक उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
     रमाई आवास योजना, राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र.1 व 2, अवर्षण क्षेत्र प्रवण कार्यक्रम आदिंचाही त्यांनी आढावा घेतला.
    यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. डॉ. सांगळे यांनी ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सन 2012-13 या वर्षात झालेल्या कामांची माहिती दिली. यात ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत दारिद्रय रेषेखालील 348 युवक-युवतींना प्रशिक्षण, प्रशिक्षण संस्थेच्या बांधकामासाठी 49 लाख निधी प्राप्त, बचत गट महिलांसाठी तालुकास्तरावर कौशल्य वृध्दी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन, राज्य्‍ ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे आयोजन तसेच बचत गट उत्पादित मालासाठी बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी तालुका विक्री केंद्र बांधकामासाठी 2 कोटी रुपये निधी  प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
Top