उस्मानाबाद :- तेरणा धरणातील गाळ काढून तो स्वत:च्या शेतात टाकण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन पालकमंत्री  मधुकरराव चव्हाण यांनी ढोकी येथे केले.
       उस्‍मानाबाद तालुक्‍यातील ढोकी येथे पालकमंत्री चव्हाण यांनी पाणीटंचाईचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना टंचाई मुकाबल्यासाठी लोक पुढाकारातून मार्ग काढण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, विश्वास शिंदे, श्री.मोदाणी, पंचायत समितीचे सदस्य अमोल समुद्रे, जिल्हा बँकेचे संचालक नारायण समुद्रे, सरपंच सुनंदा औवटी, लक्ष्मण सरडे, तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी प्रियद‍र्शिनी मोरे आदिंची उपस्थिती होती.
        टंचाईनिवारणार्थ शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. विहीरी व विंधन विहीरींचे अधिग्रहण,तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, नळयोजनांची दुरुस्ती तसेच टँकरव्दारे पाणीपुरवठा आदि माध्यमातून टंचाईचा मुकाबला करण्यात येत आहे. त्यासाठी शासन निधी उपलब्ध करुन देत असून कोणत्याही परिस्थितीत टंचाईउपाय योजनांच्या कामांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे ना. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
       सध्या जिल्ह्यातील बहुतांशी जलसाठे कोरडे पडले आहेत. येथील तेरणा धरणातही सध्या पाणी नाही, मात्र या परिस्थितीत शेतकऱ्यांनी धरणातील गाळ काढण्याच्या कामाला गती दयावी, तसेच हा गाळ आपल्या शेतात नेवून जमिन सुपीक बनवावी. लोकसहभागातून आणि लोकपुढाकारातूनच या गोष्टी होवू शकतात,असे त्यांनी सांगितले.तेरणा धरणातील गाळ काढल्यानंतर पाणी साठवण क्षमता वाढणार असल्याने त्याचाही फायदा सिंचन क्षमतेमध्ये होणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
      नागरीकांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेवून चारा छावणी काढण्यासाठी प्रयत्न करावेत,असेही त्यांनी सूचविले. यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी ढोकी येथे मोफत पाणीवाटप करणा-या नागरीकांचे कौतूक केले. नारायण समुद्रे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास ढोकी व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येनी हजर होते.

पालकमंत्री चव्हाण यांची पाडोळी येथे भेट
          पालकमंत्री चव्हाण यांनी आपल्या टंचाई आढावा दौ-यात पाडोळी
येथेही भेट दिली.येथे त्यांनी  पाणीपुरवठा संदर्भातील नागरीकांच्या अडचणी जाणून घेतल्या. गावकऱ्यांनी यावेळी आपल्या समस्या ना. चव्हाण यांच्या समोर मांडल्या. पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला गावक-यांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करावे, असे निर्देश दिले. 
 
Top