उस्मानाबाद :- महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 अन्वये नवीन शाळा स्थापन करणे व विद्यमान शाळांच्या दर्जावाढ करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी आणि प्रमाणके ठरविणे, दाननिधी निर्माण करणे या करिता आणि त्यासह संपूर्णत:  बाबीसाठी योग्य त्या तरतूदी महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित  शाळा (स्थापना व विनियमन), 2012 अन्वये  प्रसिद्ध करण्यात आला आहे, या अधिनियमात दिनांक 2 जुलै 2013 च्या अध्यादेशाद्वारे काही सुधारणा/दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.
      त्या अनुषंगाने सन 2014-15 या शैक्षणिक वर्षाकरीता सर्व माध्यमाच्या नवीन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना परवानगी देण्याकरिता व विद्यमान शाळांचा दर्जा वाढ करण्यासाठी नोंदणीकृत संस्थांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन)  अधिनियम, 2012 तसेच दिनांक 2 जुलै 2013 चा अध्यादेश शासनाच्या खालील संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
1-    www.depmah.com, 2-www.mahdoesecondary.com, 3-    www.msbshse.ac.in
    त्याप्रमाणे सदर अधिनियमाची तसेच अध्यादेशाची प्रत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचे कार्यालयात पाहण्यास उपलब्ध  होईल. सदर अधिनियमामध्ये विहित नमुन्याचा अर्ज व अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी देण्यात आलेली आहे. नवीन  शाळा मान्यतेकरिता व अस्तित्वात असलेल्या शाळांचा दर्जा वाढ करण्यासाठी  अर्ज करु इच्छिणाऱ्या संस्थांनी प्रपत्रामध्ये आपला अर्ज उपरोक्त अधिनियम तसेच दिनांक 2 जुलै, 2013 च्या अध्यादेशातील सुधारणा/दुरुस्त्या विचारात घेऊन   www.school.maharashtra.gov.in/SFC  या  संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरुन व त्यासोबत रुपये 5000/- (रुपये पाच हजार फक्त) चलनाद्वारे विहित लेखाशीर्षामध्ये जिल्हा कोषागारामध्ये जमा करुन दिनांक 31 जुलै 2013 रोजी सायंकाळी 5-00 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरलेला अर्ज, चलनाची मूळ प्रत व अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रासह संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचेकडे समक्ष सादर करावेत. लेखी स्वरुपातील तसेच पोष्टाद्वारे/कुरिअरने पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्याचप्रमाणे सदरचा अर्ज सादर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले  आहे.
 
Top