लोहारा -: डॉ. पद्मसिंह पाटील यांनी या जिल्ह्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी खुप प्रयत्न केले आहेत. सिंचनाचे क्षेत्र वाढल्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना लाभ होत आहे. जेव्हा १९९३ साली आपल्या भागात भुकंप झाला. त्यावेळी शरदचंद्र पवार यांनी व डॉ. पद्मसिंह पाटील यांनी खूप मोठे काम आपल्या भागात केले आहे. आपल्या संकट काळात जो धावून येतो आणि मदत करतो तो आपला नेता! म्हणून डॉ. पद्मसिंह पाटील यांना प्रचंड मताने निवडुन द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केले.
    बलसुर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी पदवीधर मतदार संघाचे आ. सतिश चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, डी.के. कांबळे, सौ. शैलजा मगर, प्रा. शौकत पटेल, पंचायत समिती सदस्य गुरूलिंग वाकडे, ऍड. श्रीकांत सुर्यवंशी, सरपंच विठ्ठल कांबळे, संभाजी वाकडे, श्रीपती बिराजदार, रमेश हिंगमिरे, दत्तात्रय बिराजदार, सुरेश चव्हाण, रघुनाथ मुर्टे, सतिश रणखांब, अमर नांगरे, गोविंद पाटील, इमान पटेल उपस्थित होते.
    यावेळी बोलताना श्रीकांत सुर्यवंशी म्हणाले की, येथील शिवसेनेचा उमेदवार त्यांच्या वडीलांच्या वयाच्या आमचे शरद पवार यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत बोलत होते. हे आम्ही कधीही सहन करणार नाही. शिवसेनेच्या या उमेदवाराला सभेच्या ठिकाणी खुर्चीवर नेवून बसवावे लागते. १९९३ च्या महाप्रलयकारी भूकंपानंतर किल्लारी कारखान्यावर असलेले कर्ज शरद पवार यांनी माफ केले होते. तो कारखाना या उमेदवाराने ४० कोटी कर्ज करून बुडविला. समाजातील तरूणांचे माथे भडकविण्याचे काम शिवसेनेनं केलं आहे. पण सुरेश बिराजदार यांनी अत्यंत संघर्षातून भाऊसाहेब बिराजदार कारखाना उभा केला.
    यावेळी बोलताना पदवीधर मतदार संघाचे आमदार सतिश चव्हाण म्हणाले की, निवडणुका व्हायच्या आधिच नरेंद्र मोदी स्वत:ला पंतप्रधान म्हणून घेत आहेत. अशा प्रकारे भारतीय संसदेची विटंबना नरेंद्र मोदी एवढी कुणीही केली नाही. दरडोई उत्पन्नामध्ये गुजरात १२ व्या क्रमांकावर आहे. आणि महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी या जिल्ह्यात सिंचनाच्या अनेक सोयी निर्माण केल्या. गुजरातमध्ये खूप गरीबी आहे. म्हणूनच तेथील अनेक लोक कामासाठी महाराष्ट्रात येतात. जि.प. अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे म्हणाले की, आपल्या देशात अनेक जाती-धर्मांचे लोक राहतात. पण नरेंद्र मोदी यांनी हिंदूत्वाच्या नावावर या देशाचे तुकडे करून या देशाची अखंडता संपविण्याचा डाव रचला आहे. नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये कत्तली घडविल्या. अशा माणसाला तुम्ही पंतप्रधान होवू देणार का? असे ते यावेळी म्हणाले. या सभेत भाऊसाहेब बिराजदार व रामकृष्ण नगर येथील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाखेचे अध्यक्ष रोहिदास मोकिंद चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आ. सतिश चव्हाण व प्रा. सुरेश बिराजदार यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शौकत पटेल यांनी केले. तर सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले. यावेळी व्हंताळ, समुद्राळ, एकुरगा, कडदोरा, समुद्राळ निंबाळा येथील नागरीक उपस्थित होते.
 
Top