परंडा -: विकासाची कामे एवढाच डॉ. पद्मसिंह पाटील यांचा ध्यास आहे. विकास कामे करताना त्यांनी कधीही जिल्ह्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी कायम घेतली, असे मत पाणीपुरवठा मंत्री ना. दिलीपराव सोपल यांनी व्यक्त केले.
    कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ परंडा येथील आठवडा बाजारात आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेस भुम-परंड्याचे आमदार राहुल मोटे, कॉंग्रेसचे सुभाषसिंह सद्दीवाल, माजी जि.प. सदस्य रणजित पाटील, ऍड. दादासाहेब खरसडे, दादासाहेब सोनारीकर, महेमुद पटेल, तात्यासाहेब गोरे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड. श्रीकांत भालेराव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड. संदीप खोसे-पाटील, शहराध्यक्ष वाजीद रब्बानी, रा.कॉं.चे गटनेते जाकीर सौदागर, रशीद तांबोळी, राहुल बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
    पुढे बोलताना ना. सोपल म्हणाले की, उजनीचे पाणी बोगद्याद्वारे सिना-कोळेगाव धरणामध्ये सोडण्याचे काम डॉ. पाटील यांनी करून घेतले. ते लवकरच पूर्ण होईल. जिल्ह्याचा विकास एवढाच सध्या डॉ. पाटील यांचा ध्यास आहे. गेल्या निवडणुकीपासून गायकवाड हे नॉट रिचेबल होते. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी काय केले? त्यांना तुम्ही मतदान करणार काय? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. राज्यात शेतकर्‍याच्या शेतमालाला हमीभाव मिळाला हे शरद पवार साहेबांमुळेच. मात्र विरोधक म्हणतात काय विकास झाला काय, काय केला. महाराष्ट्राही संस्काराची भूमी आहे. मात्र ज्यांना संस्काराशी कांही संबंध नाही तेच लोक सरकारला नावे ठेवतात. कोणाबद्दल बोलावे हे या लोकांना कळत नाही. समज उशीरा येते, मात्र गैरसमज लवकर निर्माण होतो. याकडे लक्ष देवून नका व १७ तारखेला घडळ्याच्या बटनावर बोट दाबुन मतदान करा, असे आवाहन सोपल यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
 
Top