उस्मानाबाद :- 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात गुरुवार, दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत विविध मतदान केंद्रांवर मतदान होणार असून निवडणूक प्रशासनाने त्याची संपूर्ण तयारी केली आहे.  आज जिल्ह्यात चारही विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष मतदान केंद्रावर वापरले जाणारे  मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले.
विविध मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आज या साहित्याचे वितरण करण्यात आले. हे सर्व साहित्य सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी एस.टी. बसेसची सोय करण्यात आली होती. उस्मानाबाद येथे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शुभमंगल कार्यालय येथे मतदान यंत्र व साहित्याचे वितरण करण्यात आले. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील साहित्याचे वितरण इंजिनिअरिंग कॉलेज, तुळजापूर येथे साहयक निवडणूक निर्णय अधिकारी राम मिराशे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. उमरगा येथे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र गुरव यांनी अंतुबळी पतंगे सभागृह, उमरगा येथे सर्व अधिकारी-कर्मचारी यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. परंडा विधानसभा मतदारसंघाचे मतदान साहित्य वाटप सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे करण्यात आले.
     मतदानसाहित्य घेऊन या सर्व कर्मचा-यांना एस.टी. बसद्वारे सुरक्षिततेसह संबंधित मतदान केंद्रांवर पाठविण्यात आले. जिल्हयातील सर्व मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात बंदी आदेश जारी करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी दिली. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारान्वये  हे आदेश जारी करण्यात आले आहेत.  
    या आदेशाचा भंग केल्यास भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.  हे आदेश निवडणूक विषयक कामकाज करणारे अधिकारी/ कर्मचारी, निवडणूक बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी/  कर्मचारी यांचेबाबत त्यांचे कर्तव्य पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाही, असे कळविण्यात आले आहे. 
 
Top