उस्मानाबाद -: 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी मतदान दि.17 एप्रिल,2014 रोजी  होणार असून मतदानाची वेळ सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. या निवडणूकीत मतदान करण्यासाठी नागरिकांनामध्ये विविध प्रकारची जनजागृती करण्यात आली असून सर्व मतदारांनी निवडणूकीचा आपला हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
      यावेळी पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख जे. टी. पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे  आदिंची उपस्थिती होती.
 या निवडणूकीसाठी 27 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या लोकसभा मतदार संघात 6 विधानसभा मतदारसंघ  असून  एकूण 17 लाख 36 हजार 124 मतदार आहेत. एकूण मतदान केंद्राची संख्या 1 हजार 971 अशी असून यात औसा-303, उमरगा-301, तुळजापूर-370, उस्मानाबाद-345, परंडा-343 तर बार्शी 309 अशी मतदान केंद्राची संख्या आहे. यात 11 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आल्याची माहिती डॉ. नारनवरे यांनी दिली.  या निवडणूकीसाठी 7 हजार 884  कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
     या निवडणूकीसाठी 27 उमेदवार रिंगणात असल्याने दोन मतदान यंत्र उपयोगात आणली जाणार आहेत. आवश्यक मतदान यंत्रे नाशिक, जळगाव आणि नागपूरहून उपलब्ध करुन घेण्यात आले आहेत. मतदान पूर्व सर्व अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण यापूर्वीच घेण्यात आले आहे.
    या निवडणूकीसाठी  प्रशासनाची  पूर्णपणे तयारी झाली असून नागरीकांनी  निर्भयपणे व कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.    
 
Top