बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- बार्शी आगारातील आगार बारा बडतर्फ कर्मचार्‍यांनी, चुकीच्या पध्दतीने कारवाई केल्याचे सांगत दि.१ मे महाराष्ट्र दिनादिवशी विभाग नियंत्रक सोलापूर यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
         याबात अधिक माहिती अशी, बार्शी आगारात २ सप्टेंबर २०१२ रोजी म.न.से. प्रणित युनियनने बंद पुकारला होता. यावेळी म.न.से.पदाधिकार्‍यांनी व्यवस्थापकाच्या तोंडावर काळी शाई फेकून झालेल्या झटापटीत साहित्याची किरकोळ तोडफोड झाली. सदरच्या घटनेला दोषी ठरवून बारा कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले. यामध्ये चालक, वाहक संतोष पंढरे, विश्वनाथ उकरंडे, शहजादा सय्यद, रामराजे भोसले, भैरवनाथ अंकुरे, इब्नेखालीन पठाण, पांडूरंग कुंभार, इंद्रसेन भड, अनिल बुलबुले, सलिममियॉं बागवान, प्रविण कदम, उत्रेश्वर यादव असे बारा कर्मचारी सेवेतून कमी करण्यात आले. याबाबत कर्मचार्‍यांशी बोलतांना, म.न.से. पदाधिकार्‍यांनी केलेल्या गैरप्रकारास कर्मचारी जबाबदार नसतांना त्यांना दोषी धरण्यात आले, विरुद्ध संघटनेतील कर्मचार्‍यांकडून सांगण्यात येणार्‍या चुकीच्या गोष्टीमुळे अधिकार्‍यांनीही चुकीचा मार्ग अवलंबला आहे. प्रशासनाकडे वारंवार अपिल करुनही निर्णय झाला नाही. सुधारित शिस्त व अपिल कार्यपध्दती २००५ नुसार प्रथम अपिलानंतर तीन महिन्यांत तक्रारीचा निपटारा करण्याचा नियम असतांना मागील आठ महिन्यांपासून कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही. बडतर्फ कर्मचार्‍यांना नोकरी नसल्याने कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेवटचा पर्याय म्हणून आत्मदहन करणार असल्याचे बडतर्फ कर्मचार्‍यांनी सांगीतले.
 
Top