बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : शहरातील नगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीने चालविण्यात येणार्‍या प्राथमिक शाळांपैकी स्वामी विवेकानंद शाळा क्र.२० या शाळेचे जागा भाडे दिले नसल्याने जागा मालकाने कुलूप ठोकल्याने, शाळेचे कामकाज शाळेबाहेरील व्हरांड्यात सुरु आहे. नगरपालिका प्रशासन मंडळाला शाळेच्या मान्यतेनुसार शैलेश गावसाने, सोमनाथ गावसाने यांनी ३ वर्ग खोल्या, शौचालय आदी सुविधांसह जागा २०१० साली दरमहा २५४० या जागाभाड्यांच्या करारानुसार उपलब्ध करुन दिली. याबाबत जागा भाडे मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करुनही अद्यापपर्यंत भाडे देण्यात आले नाही. जागा मालकाने जागा भाडे मिळत नसल्याने दि.११ एप्रिलपासून कुलूप लावले असल्याने वर्ग शिक्षक व विषय शिक्षक हे बाहेरील मोकळ्या जागेत बसून कामकाज करीत आहेत. जून २०१० मध्ये डॉ.राधाकृष्ण न.पा. शाळा क्र.१८ च्या भागशाळेला जून २०११ मध्ये स्वतंत्र स्वामी विवेकानंद न.पा.शाळा क्र.२० ला मान्यता देण्यात आली. सदरच्या शाळेमध्ये बालवाडीसह इ.१ ली ते ४ थी पर्यंतचे वर्ग असून सुमारे ७३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. २ शिक्षक व १ सेविका येथे कार्यरत असून यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या घटनेबाबत शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी चिलवंत यांच्याशी संपर्क साधला असता डेप्युटी डायरेक्टरकडे प्रस्ताव पाठविले आहेत, त्यांच्याकडून तांत्रीक चुका दुरुस्ती सुचविल्या त्यानुसार दुरुस्त्या करुन प्रस्ताव पाठविले आहेत परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही.

 
Top