ठाणे -: उल्हासनगर येथील कीर्तनानंतर परतीच्या प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे हे १५ एप्रिलच्या मध्यरात्री चिपळूणला जाण्यासाठी शीळ फाट्याजवळ उभे होते. तेव्हा पोलिसांच्या पहारा पथकाच्या वाहनासह आलेले गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद चंद्रशेखर हिरेमठ यांनी त्यांना अकारण शिवीगाळ करत अमानुष मारहाण केली. या वेळी कोकरे महाराजांच्या गळ्यातील तुळशीमाळ तोडून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या. या प्रसंगी स्थानिक वारकरी आणि हिंदुत्ववाद्यांनी एकत्र येऊन आवाज उठवल्यामुळे पोलिसांनी लेखी क्षमायाचना केली; मात्र पोलिसांच्या या उद्दामपणाच्या विरोधात वारकरी संप्रदायात संतापाची लाट पसरली आहे. जोपर्यंत दोषी पोलिसांना शिक्षा होत नाही, निलंबन होत नाही, तोपर्यंत मागे हटायचे नाही, असा निर्धार वारकरी संप्रदाय आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांनी केला आहे.
     १५ एप्रिल या दिवशी रात्री २ वाजता येथे शीळ डायघर पोलीस ठाण्याचे रात्रीचे पहारा पथक एम्एच्०४-एएन्९७७ वाहनातून तेथे आले. त्या वेळी उभे असलेले कोकरे महाराज यांना ए....मरशील की रे.... असे म्‍हणाले. त्यावर ह.भ.प. कोकरे महाराज म्हणाले, साहेब, तेवढे समजते की आम्हाला ! त्यामुळे हिरेमठ यांनी गाडीतून उतरून ह.भ.प. कोकरे महाराज यांना अर्वाच्च शिवीगाळ करत फटाफट कानफटात मारल्या. कोकरे महाराज यांनी मी वारकरी आहे. आताच कीर्तन करून गावी निघालो आहे, असे सांगितल्यावरही पोलिसांनी त्यांना मारहाण केली.
    मध्यरात्री २.४० वाजता ह.भ.प. कोकरे महाराज यांनी दूरध्वनीद्वारे स्थानिक हिंदुत्ववादी, वारकरी संप्रदायाचे स्थानिक प्रमुख आणि सनातन संस्थेचे साधक यांना संपर्क केला. पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख ह.भ.प. अजय महाराज पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष ह.भ.प. धनाजी महाराज पाटील, घोट येथील तालुकाध्यक्ष ह.भ.प. आत्माराम बुवा पाटील, ठाणे तालुकाध्यक्ष ह.भ.प. भानुदास महाराज पाटील, कल्याण तालुका संचालक ह.भ.प. रामदासबुवा चौधरी, ह.भ.प. तुकाराम महाराज पाटील, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प. अनंतबुवा भोईर, ह.भ.प. सत्यवान महाराज काळंज, ह.भ.प. संतोष महाराज पाटील, ह.भ.प. पंडित महाराज पाटील, ह.भ.प. तुकाराम महाराज पाटील, ह.भ.प. किसन जाधव, ह.भ.प. रमेश पाटील, ह.भ.प. जगन्नाथ पाटील, सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक, शिवसेना आणि बजरंग दल यांचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित झाले. त्यांनी हिरेमठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
      राष्ट्रीय वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते म्हणाले की, पोलिसांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ म्हणाले की, हिंदु संस्कृतीचा प्रचार करत असल्यामुळेच ही मारहाण झाली आहे; मात्र वारकरी त्याला घाबरणार नाहीत. वारकरी प्रबोधन समितीचे अध्यरक्ष ह.भ.प. रामेश्‍वर महाराज शास्त्री म्हणाले की, गृहमंत्री रा.रा. पाटील यांनी संबंधित पोलिसांना निलंबित केले पाहिजे. वारकर्‍यांना अकारण मारहाण करणार्‍या पोलिसांचे अन्वेषण करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीने या वेळी केली आहे. या संदर्भात वारकरी संप्रदायाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.
 
Top