'झुक झुक आगीन गाडी, पळती गाडी पाहू या, मामाच्‍या गावाला जाऊ या!' या बालगीताचा विसर आता पडला असून काळाच्‍या ओघात अन् इंटरनेटच्‍या जमान्‍यात मामाचा गाव हरवला आहे. पूर्वी उन्‍हाळी सुट्टी शाळेला होण्‍यापूर्वी बच्‍चे कंपनी मनात बते रचायची, ते मामाच्‍या गावाला जाऊन धम्‍माल करण्‍याचा... पण सध्‍याच्‍या इंटरनेटच्‍या युगात मामाचा गाव परका झाला आहे. त्‍याची जागा आता फेसबुक, व्‍हॅटसअॅप आणि व्‍हीडीओ थ्रीडी गेमने घेतली आहे. वयाच्‍या खोट्या माहितीच्‍या आधारे लहान लहान शाळकरी मुले-मुली फेसबुकवर बनावट खाते उघडून गप्‍पामध्‍ये रमत आहेत. त्‍यामुळे पालकांनी वेळीच सावध होऊन यांना रोखायला हवे...
    पूर्वी मामाच्‍या गावी मोठी धम्‍माल व्‍हायची. सुरपारंबा, ईट्टी-दांडू, लंगडी, चिंचोके, गजगे, कोया, गोट्या, काचकोरे, चिंपा, लिगोर, लपाछपी, चोर-पोलीस हे खेळ मोठ्या गंमतीने खेळले जायचे. त्‍यातून आनंदही मिळायचा. 'आपडी तुपडी तेलंगी धार, धर गं बेबी हीच कान' म्‍हणत एकमेकांचे कान पकडायचे आणि 'चाऊ, माऊ, चाऊ गाऊ... पकालीचे पाणी गुटु गुटू पीऊ' असे म्‍हणून आंनद लुटला जायचा. शेतातील आंबे, टरबूज, कलिंगड यावर ताव मारायचा.. पण निसर्गाच्‍या लहरीपणामुळे आंबेही आता क्‍वचितच दिसत आहेत. ईट्टी-दांडू खेळत खेळत जनावरे दूर गेली की, नंबरप्रमाणे जनावरे हाकत आणायचे. पूर्वीसारखे आता काही राहिले नसल्‍याचे अनेकजण बोलतात. आता प्रत्‍यक्ष गाठीभेटी घेण्‍यास कुणालाही वेळ नाही. फक्‍त मोबाईल वरुन विचारपूस करायची कसे काय चाललयं? बरं हाय नव्‍हं..? पूर्वी लग्‍नपत्रिका घरपोच केल्‍या जायच्‍या... भाकरी बांधून न्‍यायच्‍या आणि पाहुण्‍यांना लग्‍नाला यायला सांगायचे. पण आता या लग्‍नपत्रिकांची जागा एसएमएस ने घेतली असून चक्‍क मोबाईलवरच लग्‍नपत्रिका पाठवली जात आहे. याला काय म्‍हणायचे, काळ बदलला म्‍हणायचे की माणसं बदलली म्‍हणायचं...!
- भिकाजी जाधव
कळंब
 
Top