खरीप हंगामात शेतक-यांची आर्थीक उन्नती व्हावी, त्यांच्या प्रयत्नास यश मिळावे, कमी काळात, कमी वेळेत अधिक उत्पन्न देणारी पीक घेवून त्यांचा फायदा व्हावा, यासाठी आपत्कालीन पीक व्यवस्थापनाबाबत राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे मार्गदर्शन करण्यात येत आहे. कोणत्या कालावधीत कोणते पीक घ्यावे, याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
    लहरी हवामानाचा फटका नेहमीच शेतकऱ्यांना बसतो. त्यातच पावसाचे उशीरा होणारे आगमन, पाऊस आल्यानंतरही त्याची अनियमितता यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेली पीके वाया जातात. श्रम आणि आर्थिक फटकाही शेतकऱ्यांना बसतो. हे टाळण्यासाठी कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांना आपत्कालीन पीक नियोजन व व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना आपत्कालीन काळात शेतीची निगा, करावयाची उपाययोजना पेरणी योग्य पावसाचे आगमन व कालावधीमध्ये कोणती पीक घ्यावी व कोणती घेवून नयेत, याबाबत शेतकऱ्यांना मौलिक सल्ला देण्यात येत आहे.
    खरीप हंगाम आता सुरु झाला आहे. अद्यापही जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. खरीप हंगामात पाण्याचा ताण पडल्यास पीकवाढीच्या काळात 15 ते 20 दिवसाची उघडीप झाल्यास पिकावर पाण्याचा ताण येण्याची शक्यता असल्याने शेतक-यांनी काही बाबी लक्षात घेऊन वेळेत शेतीची कामे करणे आवश्यक आहे.
    जमिनीत ओलावा टिकविण्यासाठी शेत तण विरहीत ठेवावे. तणामुळे ओलाव्यासाठी व अन्न द्रव्यासाठी पिकाबरोबर स्पर्धा वाढून ती पिकांना उपलब्ध होत नाही. त्यासाठी खुरपणी, निंदणी करावी. कोळप्याची हलकी पाळी दिल्यास जमिनीतील भेगाव्दारे नष्ट होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळता येतो. आच्छादनाचा वापर करावा. उदा-गिरीपुष्प/ सुबाभूळ पाला किंवा गव्हाचे काडे पसरावे. पिकाच्या बाष्पीउत्सर्जन कमी करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. पाण्याची उपलब्धता असल्यास संरक्षित किंवा पीक जगविण्यासाठी पाणी दयावे, तुषार पध्दतीने पाणी दिल्यास जास्तीचे क्षेत्र कमी कालावधीत भिजविता येईल. तुषार पध्दतीने शक्य नसल्यास एक आड एक सरी भिजवावी व उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करावा.
    पाण्याचा ताण दिर्घकाळ राहील्यास पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उदा- कापूस पिकावर फुलकिडे तर सोयाबीन पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळया, पाने कुरतडणाऱ्या अळ्या, केसाळ अळ्या आदि किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत कीड नियंत्रण करणे गरजेचे असते.
    उघडिपीनंतर पाऊस पडल्यास नत्राची मात्रा दयावी. कोळप्याच्या साहयाने अथवा लाकडी नांगरास 5 ते 6 इंचावर दोरी बांधून 4 ओळीनंतर सऱ्या काढाव्यात. यामुळे पुढे पडणाऱ्या पावसाचे मुलस्थानी जलसंवर्धन होईल, अशा तऱ्हेने नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करुन पिकाचे संरक्षण करावे.
    अतिवृष्टीच्या कालावधीत घ्यावयाची काळजी- अतिवृष्टी झाल्यास शेतातील पाण्याचा निचरा करावा, कापूस, तूरसारख्या जास्त अंतरावरील पिकात एक आड एक सऱ्या काढाव्यात म्हणजे पाण्याचा ताण पडल्यास संरक्षित पाणी दयावे व अतिवृष्टी झाल्यास निचरा होण्यास मदत होईल. जमीन आणि पाण्याचे संवर्धन करणे हा कोरडवाहू शेतीचा आत्मा आहे.
    यानुसार,  दिनांक 1 ते 15ऑगस्ट या कालावधीत संकरित बाजरी, रागी, सुर्यफुल, तूर, एरंडी-धने, एरंडी+तूर,एरडी+आणि धने अपरिहार्य परिस्थीत घ्यावीत. परंतु कापूस, संकरित ज्वारी, भुईमुगाची लागवड करु नये. दि.16 ते 31 ऑगस्ट या कालावधीत संकरित बाजरी, सुर्यफुल, तुर, एरंडी+धने, एरंडी+तूर आणि धने अपरिहार्य परिस्थिती लागवड करावीत. परंतु कापूस, संकरितज्वारी, भुईमग आणि तीळ ही पीके घेवू नयेत.
    दि.20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत रब्बी ज्वारी, करडई पीके घ्यावीत. परंतु हरभरा, जवस आणि गव्हाची पेरणी करु नये. दि. 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत रब्बी ज्वारी, करडई आणि जवसाची पीके घ्यावीत. परंतु सुर्यफुल व गव्हाची पेरणी करु नये. आणि दि. 16 ऑक्टोबर ते 10 नोव्हेबर या कालावधीत हरभरा, करडई, गहू आणि जवसाची पीके घ्यावीत. परंतू रब्बी ज्वारी आणि सूर्यफुल या पीकाची लागवड करु नये.
    शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी गावपातळीवरील कृषी सहायक यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी, तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, आणि जिल्हास्तरावर अधीक्षक कृषी कार्यालय आणि जिल्हा परिषदेचा कृषी विभाग यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला तरीही त्यांना ही माहिती मिळू शकेल. त्यामुळे या सर्व मार्गदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही कृषी विभागाच्या मार्फत करण्यात येत आहे.    

- जिल्हा माहिती कार्यालय,
उस्मानाबाद

 
Top