उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासकामांसंदर्भात केंद्र शासनाकडे प्रलंबित प्रस्ताव असतील तर राज्य शासनामार्फत पुन्हा ते  प्रस्ताव सादर करावेत. ते प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश मागास जिल्हा म्हणून करण्याबाबत आणि त्यासंदर्भातील सवलती जिल्ह्यास मिळण्याबाबतही पाठपुरावा करु, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी केले.
   टंचाई परिस्थितीच्या कार्यवाहीबाबत पुन्हा एकदा आवश्यक ती पावले उचलून प्रत्यक्ष गावनिहाय संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत भेटी देऊन वस्तुनिष्ठ अहवालानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. ठिबक सिंचनासाठीचा केंद्र शासनाचा अनुदानाचा प्रलंबित निधी देण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 
         श्री. गीते यांनी बुधवारी सकाळी उस्मानाबाद तालुक्यातील घुगी, कोंड, नितळी, मेंढा आदी गावांना भेटी देऊन तेथील पीक परिस्थिती व टंचाई परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात टंचाईबाबत आढावा बैठक घेतली.  खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, सुधीर पाटील, उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड, तहसीलदार सुभाष काकडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
      यावेळी संबंधित गावात जाऊन श्री. गीते यांनी पीक परिस्थितीची पाहणी केली. तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक पेरणी, पीक कर्ज वाटप, बी-बियाणे वाटप आदींबबत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी आढावा बैठकीत विविध शासकीय यंत्रणांची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
        जिल्ह्यातील सध्याचा उपलब्ध पाणीसाठा, प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, बोअर- विहीर अधीग्रहण आदींची श्री. गीते यांनी माहिती घेतली. जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असणाऱ्या भूजलपातळी वाढविण्यासाठीच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.  सरासरीपेक्षा उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.  गेल्या सलग दोन वर्षातही टंचाई परिस्थिती होती.  टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केंद्र शासनाकडून केले जाईल. उस्मानाबाद जिल्ह्यासंदर्भातील प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासनामार्फत पाठपुरावा करावा, त्यांची सोडवणूक करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
          उस्मानाबाद जिल्ह्याचा केंद्र शासनाच्या मागास जिल्हा यादीत समावेश नाही. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनामार्फत सादर करावा. उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश या यादीत करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे श्री. गीते यांनी यावेळी सांगितले. टंचाई परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सामाजिक संस्था पुढाकार घेणार असतील तर त्यांना आवश्यक ते सहकार्य आणि प्रोत्साहन प्रशासनाने द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
        पाणलोट क्षेत्र वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घ्याव्यात, स्थानिक पातळीवर एकात्मिक पद्धतीवर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्ज देताना अडवणूक करणाऱ्या बॅंकावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही श्री. गीते यांनी दिल्या.    जिल्ह्यात अवजड उद्योग आणण्यासंदर्भातील मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
        यावेळी आमदार राजेनिंबाळकर, आ. चौगुले, श्री.पाटील यांनीही जिल्हाविकासा संदर्भातील अपेक्षा केंद्रीय मंत्री श्री. गीते यांच्यासमोर मांडल्या. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
        दरम्यान,  केंद्रीय मंत्री श्री. गीते यांचे मंगळवारी औरंगाबादहून तुळजापूर येथे आगमन  झाले. श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी उस्मानाबाद येथील मुक्कामी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा केली.                  
 
Top