उस्मानाबाद - कृषी विभागामार्फत केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध प्रकारच्या पावणेदोनशे योजना राबविल्या जात आहेत.  या योजनांची प्रभावी अंमलबजावणी या शेतकरी गटामार्फत करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांचे गटाची स्थापना करण्याची मोहिम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. या मोहिमेत 100 टक्के शेतकऱ्यांनी  गटाची नोंदणी करुन सहभाग नोंदविण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले.  
    येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात कृषि सहायक, मंडळ अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांची गटनोंदणी बाबत नुकतेच आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, आत्माचे प्रकल्प संचालक व्ही.डी.लोखंडे, उपविभागीय कृषि अधिकारी यु.बी.बिराजदार, आर.टी.जाधव, कृषि उपसंचालक एम.एस.मीनीयार, आत्माचे उपसंचालक एस.आर.चोले, जिल्हा रेशम विकास अधिकारी श्रीमती पी.एस.गणाचार्य, मत्स्य विभागाचे र.धो.औरंगे यांची उपस्थिती होती.
डॉ.नारनवरे म्हणाले की, सर्व शेतकऱ्यांच्या गटांची नोंदणी झाल्यास शेतकऱ्यांना संगणकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी विभागाच्या विविध योजना व शेती विषयक परिस्थिती आणि किती शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेतला याची  माहिती काही मिनीटातच घर बसल्या उपलब्ध्‍ होऊ शकेल. ही मोहिम शेतक-यांच्या दृष्टीने हिताची आहे. राष्ट्रीय पीक विमा योजनेचे उदिृष्ट याच माध्यमातून कृषी सहायकांना पूर्ण करता येईल. यापुढे कृषि योजनेची अंमलबजावणी नोंदणी गटाच्यामार्फतच करण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. कृषी सहायकांनी हे उदिष्ट 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावयाचे असल्याने शेतकऱ्यांनी गट नोंदणीसाठी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.     
श्री.तोटावार यांनी मंडळनिहाय आढावा घेतांना सांगितले की, कृषि सहायकांनी 15 सप्टेंबरपर्यंत गटाची नोंदणी करुन जिल्ह्याचा एक आदर्श निर्माण करावा. गावात सकाळी व सायंकाळीच्या वेळेत शेतकऱ्यांच्या भेटी होतात त्या वेळेसच जाऊन नोंदणी करावी. गावात जाण्याअगोदर त्या गावात दवंडी देऊन वेळ व तारीख निश्चित केल्यास जास्तीत जास्त शेतकरी गटाची नोंदणी होईल, यासाठी नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
           या बैठकीस जिल्ह्यातील कृषि सहायक, मंडळ अधिकारी तसेच संबंधित कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.                     
 
Top