बार्शी -  सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी विद्युत कामांत व्यस्त असलेल्या युवकास विजेचा झटका बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पांगरी (ता.बार्शी) येथे घडली आहे.
          चेतन शिवाजी काळे (वय २५, रा.पांगरी) असे यातील मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. यातील मयत काळे हा युवक सोमवारी दि.८ रोजी पांगरी येथील सार्वजनिक गणेश उत्सवातील किरकोळ वीजेची कामे करत होता यावेळी सदरची घटना घडली. विजेचा झटका बसल्याने त्याला बार्शीतील जगदाळे मामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्यास मयत घोषीत केले. बार्शी पोलिसांत अकस्मात मयत नोंद करण्यात आली असून घटनेची चौकशी व तपासासाठी पांगरी पोलिसांकडे प्राथमिक माहिती वर्ग करण्यात आले आहे. सार्वजनिक उत्सवामध्ये घेण्यात येण्याच्या उपाययोजना व अत्यावश्यक काळजीकडे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेवरुन दिसून येत आहे. अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या मंडळाचे कार्यकर्ते उत्साहात कार्यक्रम करत असतांना जीवावर बेतणार्‍या विद्युत कनेक्शनसारख्या धोकादायक बाबींची काळजी घेतांना दिसून येत नाहीत. सामाजिक प्रबोधनासाठी सुरु झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात अनेक ठिकाणी होणार्‍या दुर्घटना या बर्‍याच गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब निदर्शनास आणून देतात. पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी अनेक ठिकाणी भेटी देऊन गणेशोत्सव साजरे करणार्‍या मंडळाच्या पदाधिक्यांची चर्चा करुन समजाऊन सांगत असल्याचे दिसून येते परंतु विद्युत विभागचे कर्मचारी व अधिकारी मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक करुन गंभीर विषयाकडे पाठ दाखविल्याचे दिसून येते. बार्शीतील गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीतदेखिल विद्युत विभागाने दाखविलेली पाठ ही गांभीर्य नसल्याचे द्योतक आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासारख्या उत्सवांसाठी विविध मंडळांना विद्युत कनेक्शनसाठी असलेल्या प्रक्रियेतील विलंब, त्यासाठी द्यावयाची आगाऊ रक्कम तसेच दिलेल्या आगाऊ रकमेतील उर्वरित रक्कम परत मिळत नसल्याने अनेक उत्सव मंडळे ही इतर मार्गांचा अवलंब करुन विजेचे कनेक्शन जोडणी केल्याचे दिसून येते. सदरच्या कृत्यांमुळे अनेक ठिकाणी धोकादायक बाबी दिसून येतात यातील काही ठिकाणी अशा प्रकारचे अपघात होतात व त्यामुळे काही जणांच्या प्राणावर बेतते. सदरच्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
 
Top