नळदुर्ग - येथील घरकुल योजना पूर्ण होत नसल्यामुळे लाभार्थ्यांना बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजासहित लोकवाट्याची रक्कम परत करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने नगरपालिकेच्या मुख्याधिका-याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नळदुर्ग येथे केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत १,२०६ घरकुलांची महत्त्वाकांक्षी योजना मंजूर झाली आहे. त्यापैकी केवळ ३०२ घरकुले तयार झाली. परंतु तीही निकृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळे घरकुल वाटप केल्यास लाभार्थ्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो. लाभार्थ्यांनी लोकवाट्याची रक्कम भरून वर्षे होऊन गेली आहेत. परंतु, अद्याप त्यांना घरकुल वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या पदाधिका-यांनी ही रक्कम लाभार्थ्यांना बँकेप्रमाणे व्याजासहित दामदुप्पटीने द्यावी, अशी मागणी मुख्याधिका-यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनावर तालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहराध्यक्ष संतोष पुदाले, युवा सेनेचे ज्ञानेश्वर घोडके, शिवाजी गायकवाड यांच्यासह लाभार्थ्यांच्या सह्या आहेत.

 
Top