नळदुर्ग - येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहार करणारांवर कारवाई व्हावी, तसेच कारखाना सुरळीत चालावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी रोजी कारखान्याच्या  मुख्‍य प्रवेशद्वारासमोर आरती करण्यात आली.
    मनसेचे जिल्हा सचिव अमरराजे कदम यांच्या हस्ते शुक्रवारी रोजी आरती करण्यात आली. तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, गैरव्यवहार करून कारखाना मोडकळीस आणल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच कारखाना बंद असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना असतानाही त्यांना अन्यत्र ऊस पाठवावा लागत आहे. अनेकांचा ऊस फडातच वाळून गेला. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असतानाही प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत नाही, त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला.
कारखान्यावर कर्जाचा डोंगर असून, कारखान्यातील गैरकारभाराची चौकशी व्हावी, संचालक मंडळाला सुबुद्धी यावी कारखाना सुरू होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धीचे दिवस यावेत, यासाठी मनसेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बशीर शेख, शहराध्यक्ष ज्योतीबा यडगे, महेश जाधव, मल्लिनाथ कुंभार, एस. के. जहागिरदार, महेश जाधव, मल्लिनाथ कुंभार, सूरज कठारे, अमोल शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top