बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर)  खांडवी (ता.बार्शी) येथील राजे, छत्रपती, मातोश्री, संघर्ष, शिवमावळे, शिवप्रेमी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या घोड्यांच्या नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. अशा प्रकारच्या स्पर्धा प्रथमच होत असल्याने ग्रामस्थ व हौशी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
    या स्पर्धा शुक्रवारी दि.१२ रोजी खांडवी (ता.बार्शी) येथील बारंगुळे वस्तीमध्ये घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे विरोधीपक्षनेते अरुण बारबोले, श्री माळी, जिल्हा परिषदेचे विरोधीपक्षनेते संजय पाटील, संतोष निंबाळकर, नगरसेवक अशोक सावळे आदी उपस्थित होते.
     स्पर्धेतील सहभागी घोड्यांकडून दोन पायावर चालणे, छोट्या बाकावर चारही पायांवर उभे राहणे, अरुंद बाकावर घोडे उभे करुन घोड्यांचा प्रशिक्षक त्याखालून जाणे, घोड्याला नंदीबैलासारखे बसविणे, घोडागाडीवर घोडे उभे करुन नाचविणे आदी प्रकारांची प्रात्यक्षीके दाखविण्यात आली. या स्पर्धेकरिता नाममात्र पारितोषिके ठेवण्यात आली असली तरी घोड्यांचा सांभाळ करणार्‍या हौशी कलाकारांनी स्पर्धेस मोठा प्रतिसाद दिला. या स्पर्धेतील विजेते ठरलेल्या घोड्यांचे मालक पुढीलप्रमाणे लखन सदगुणे (प्रथम), सुनिल बारंगुळे (द्वितीय), शाहू शेंडगे (तृतीय), संतोष पवार (चतुर्थ), पिंटू लोखंडे (उत्तेजनार्थ), विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
 
Top