सोलापूर -   जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुलांना इंग्रजीचे ज्ञान देणे अत्यावश्यकच आहे. तरच विद्यार्थी पुढे स्पर्धात्मक युगात टिकू शकतील असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता खात्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीपराव सोपल यांनी केले.
  हरिभाई देवकरण प्रशालेच्या सभागृहात शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा              डॉ. सौ. निशिगंधा माळी, शिक्षण सभापती शिवानंद पाटील, महिला- बालकल्याण सभापती सौ. जयमाला गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डूबे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेंद्र बाबर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री सोपल म्हणाले की, बहुतांश शिक्षक हे विद्यार्थी दशेत शिक्षक व्हावे या ध्येयाने शिक्षक झालेले असतात. ध्येयाने प्रेरित होवून या क्षेत्रात आल्यानंतर विविध चांगले उपक्रम राबवितात. जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना इंग्रजीचे ज्ञान देणे अत्यावश्यक आहे. तरच ते विद्यार्थी स्पर्धात्मक युगात टिकू शकतील. विद्यार्थ्यांना चांगले गुणवत्तेचं सक्षम होण्यासाठीच शिक्षण मिळाले पाहिजे असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात जि.प. अध्यक्ष डॉ. निशिगंधा माळी म्हणाल्या की, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांना काय नाविण्यपूर्ण देता येईल याचा विचार केला पाहिजे. शिक्षकांच्या हातून देशाची पिढी घडविण्याचे महत्वपूर्ण कार्य केले जाते असे सांगून शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. तर मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पारंपारिक क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यात यावे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांसाठीची आवश्यक पुस्तके टप्प्या टप्प्याने वाचनालयातून उपलब्ध करुन दिली जातील. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. लवकरच ई–फाईल चा उपक्रम सुरु केला जाईल. कोणत्याही शिक्षकांना आपल्या समस्यांसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये यावे लागणार नाही. शिक्षकांनी शिक्षणाकडे पूर्ण लक्ष द्यावे हा या मागचा हेतू असल्याचे सांगितले.
प्रारंभी प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर यांनी प्रास्ताविक केले तर शिक्षण सभापती शिवानंद पाटील यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले.याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते आदर्श शिक्षकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
 
Top