नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केला. या दोन्ही राज्यांत एकाच टप्प्यात म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, लगेचच १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
              दिवाळी पुर्वीच  महाराष्‍ट्र व हरियाणा या  राज्यात नवे सरकार स्थापन होणार आहे. २७ सप्टेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून, १ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. यासंबंधी आज लगेचच आचारसंहिता लागू झाली असून, २० सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी होणार आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
     महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी आणि हरियाणातील ९० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. बीडमधील लोकसभेची पोटनिवडणूकही याच दिवशी होणार आहे.
महाराष्ट्रात एकूण ८ कोटी २५ लाख मतदार आहेत, तर हरियाणातील मतदारांची संख्या १ कोटी ६५ लाख आहे. मतदानादरम्यान मतदार नोटाचाही वापर करू शकतात, असे संपत यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात मतदानासाठी ९० हजार ४०३ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. या दोन्ही राज्यांत काँग्रेसचेच सरकार आहे, तर केंद्रात भाजप आघाडीचे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने यश मिळवत बहुमताने सत्ता स्थापन केली. सरकार स्थापन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्याच विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्यासाठी ही पहिली परीक्षा ठरणार आहे. या निवडणुकीतूनच मोदींच्या जादूचा अंदाजही येणार आहे.
निवडणूक आयोगाने आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने आजपासूनच आचारसंहिता लागू झाली असून, २० सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. २७ सप्टेंबर उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. २९ सप्टेंबर रोजी अर्जाची छाननी, तर १ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी मतदान आणि १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होईल. निवडणुकीची अधिसूचना जारी होईपर्यंत दोन्ही राज्यांतील नागरिक मतदार म्हणून नोंदणी करू शकतात. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ७ नोव्हेंबरला संपत आहे, तर हरियाणा विधानसभेची मुदत महाराष्ट्र विधानसभेच्या अगोदरच म्हणजे २७ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे या अगोदरच या दोन्ही राज्यांच्या निवडणुका होणे गरजेचे होते. त्यातच २२ ऑक्टोबर रोजी दिवाळी सुरू होणार आहे. या सणासुदीच्या काळात सुरक्षा यंत्रणेवर ताण पडू शकतो, याचा विचार करून निवडणूक आयोगाने दिवाळीआधीच विधानसभा निवडणूक होईल, या दृष्टीने विचार करून विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर केली. विशेष म्हणजे दोन्ही राज्यांत एकाच टप्प्यात निवडणुका घेण्याचा धाडसी निर्णयही निवडणूक आयोगाने घेतला. त्यामुळे दोन्ही राज्यांत दिवाळीअगोदरच नवे सरकार स्थापन होणार आहे. अर्थात, सत्तेवर येणा-या नेत्यांची ख-या अर्थाने दिवाळी होणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना अशीच प्रमुख लढत आहे. त्यात काही जागा मित्रपक्षांना सुटतील. अद्याप आघाडी आणि महायुतीत जागा वाटप झालेले नाही. त्यातच आज निवडणूक कार्यक्रम झाल्याने राज्यात सर्वच पक्षांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.

 
Top