उस्मानाबाद - जिल्ह्यात होणा-या विधानसभा निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सर्व यंत्रणांना निर्देश दिले असून या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी  सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. जिल्ह्यात असणाऱ्या चारही मतदारसंघातील नागरिकांनी त्यांचे नाव मतदार यादीत आहे, याची खात्री करावी आणि या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
         डॉ. नारनवरे यांनी आज जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधी यांची निवडणुकीसंदर्भात येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी भालचंद्र चाकूरकर,जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी के.बी. कौंडेकर, नायब तहसीलदार डी.जी. वाघमारे यांच्यासह राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची यावेळी उपस्थिती होती.
           विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-2014 चा कार्यक्रम मा.भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचेकडून दि. 12 सप्टेंबर,2014 रोजी घोषित झाला असून याबरोबर आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातंर्गत एकूण 4 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्याअनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना यावेळी निवडणूकीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय माहिती देण्यात आली. एकूण मतदार, मतदानकेंद्रांची संख्या, मतदानासाठी आवश्यक असणारी इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्रे आदींची यावेळी माहिती देण्यात आली. याशिवाय निवडणूक कार्यक्रमाची माहितीही देण्यात आली. त्यानुसार, निवडणूक अधीसूचना प्रसिद्धी- शनिवार, दि. 20 सप्टेंबर, नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा शेवटचा दिनांक – शनिवार, दि. 27 सप्टेंबर, नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक- सोमवार, दि. 29 सप्टेंबर, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा शेवटचा दिनांक- बुधवार, दि. 1 ऑक्टोबर, मतदान दिनांक- बुधवार, दि. 15 ऑक्टोबर आणि मतमोजणी दिनांक-रविवार, दि. 19 ऑक्टोबर, 2014 असा कार्यक्रम असणार आहे.
            जिल्ह्यात दि.1 जानेवारी-2014 या अर्हता दिनांकावर आधारित दि.31 जुलै, 2014 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये 204-उमरगा (अ.जा.)  पुरुष मतदार 1 लाख 43 हजार 934 तर स्त्री मतदार 1 लाख 29 हजार 739 व इतर 4 असे एकूण 2 लाख 79 हजार 677 मतदार आहेत.   241-तुळजापूर, पुरुष मतदार 1 लाख 77 हजार 433 तर स्त्री मतदार 1 लाख 50 हजार 382 व इतर 7 असे एकूण 3 लाख 27 हजार 822 मतदार आहेत. 242-उस्मानाबाद  पुरुष मतदार 1 लाख 73 हजार 276 तर स्त्री मतदार 1 लाख 49 हजार 549 व इतर 2 असे एकूण 3 लाख 22 हजार 827 मतदार आहेत. 243-परंडा पुरुष मतदार 1 लाख 56 हजार 873 तर स्त्री मतदार 1 लाख 34 हजार 57 व इतर 2 असे एकूण 2 लाख 90 हजार 932 मतदार आहेत तर जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार 6 लाख 57 हजार 516, स्त्री मतदार 5 लाख 63 हजार 727 व इतर 15 असे एकूण 12 लाख 21 हजार 258 असे मतदार आहेत.
        240-उमरगा (अ.जा.) मतदारसंघासाठी  उमरगा उपविभागीय अधिकारी रवींद्र गुरव, 241-तुळजापूर साठी जिल्हा पुरवठा अधिकारी बी. एस. घुगे, 242-उस्मानाबादसाठी उपविभागीय अधिकारी, उस्मनाबाद अभिमन्यू मुळे आणि 243-परंडा विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी संतोष राऊत  हे निवडणूक निर्णय अधिकारी राहणार आहेत.
      प्रशासनाच्या वतीने मतदारजागृतीसाठी स्वीप-2 कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. राजकीय पक्षांनीही  मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक मतदान करण्यासाठी सकारात्मक भूमिका बजावावी, असे आवाहन डॉ. नारनवरे यांनी केले.  यावेळी राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान केंद्रनिहाय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे रॅंडमायझेशन करण्यात आले.     
 
Top