बार्शी - आजकाल गुलालामध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स आढळून येतात. अशा प्रकारच्या गुलालामध्ये डोळ्यांसारख्या नाजूक अवयवांवर परिणाम होण्याची शक्यता असते. गणेशोत्सवातील मिरवणुकांत गुलाल वापरण्याऐवजी विविध प्रकारची फुले घेऊन त्याच्या पाकळ्या उधळून चांगला आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी केले.
   
    गणेशोत्सवानिमित्त बार्शीतील गणेश मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर परिविक्षाधिन उपविभागीय पोलिस अधिक्षक प्रशांत अमृतकर, पोलिस उपअधिक्षक सर्जेराव ठोंबरे, पोलिस निरीक्षक सालार चाऊस, नायब तहसिलदार श्री पवार आदी उपस्थित होते. फेसबुक सारख्या सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या कोणत्याही भावनात्मक घटनेचे पडसाद म्हणून अनेकजण बसवर दगडफेक करतांना दिसतांत यावेळी त्यांनी यामध्ये बसलेले चालक, आतील प्रवाशी हे आपलेच कोणीतरी बांधव आहेत याचे भान ठेवणे गरजेचे आहे. अशा प्रकारांमध्ये देशद्रोही शक्ती असल्याचे उघड होत आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे ही किचकट बाब आहे तोपर्यंत संयम आणि भान राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बोलतांना मंडलिक म्हणाले, बार्शी, मोहोळ आणि अक्कलकोट हे तीन तालुक्यातील वातावरण अनेक वेळेस अशांत राहील्याने यावर विशेष लक्ष आहे. पोलिस बंदोबस्त आणि कायद्याचे कठोर पालन केले जाईल. कोणत्याही दोषी व्यक्तींची गय केली जाणार नाही, आगामी निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना निर्भिडपणे मतदान करता येण्यासाठी विशेष अंमलबजावणी करण्यात येईल. तरुणांनी राजकीय वातावरणात स्वत:चे करिअर खराब करु नये. इतरांच्या प्रोत्साहनामुळे तरुण गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असतांना छोट्या मोठ्या गुन्ह्यात अडकले तर त्यांना तात्पुरते राजकिय पाठबळ मिळेल, परंतु पुन्हा आयुष्यभर त्यांना आर्थिक व मानसिक त्रास होईल यावेळी कोणतेही राजकिय लोक पाठीशी राहत नाहीत असे अनेकांचे अनुभव आहेत, अशा अनेक शिक्षा भोगलेल्या अथवा भोगत असलेल्या व्यक्तींकडून त्यांनी माहिती घ्यावी. अशा प्रकारांमध्ये अनेकांची घरेदारे उध्वस्त होत आहेत त्याचा विचार करावा, बार्शीत शांतता प्रस्थापित होण्यासाठी तरुणांनी विचार करावा असे सकारात्मक आवाहन डोक्यात कोरुन ठेवा असेही त्यांनी यावेळी म्हटले.
 
Top