सिंधुदुर्ग -   सर्वप्रथम प्रचाराचा नारळ फोडणा-या काँग्रेस नेत्यांनी आता १७ सप्टेंबरला पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी दिली. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, आपण कुडाळमधून, तर नितेश राणे कणकवलीमधून निवडणूक लढविणार असल्याचेही राणे यांनी यावेळी सांगितले.
                  राज्य विधानसभा निवडणुकीची घोषणा
     दोन दिवसांपूर्वीच झाली आहे. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या असून, काँग्रेसने आघाडीच्या निर्णयाची वाट न बघता पक्षीय पातळीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेस नेत्यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याअगोदरच सर्वप्रथम प्रचाराचा नारळ फोडला. आता उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यातही आघाडी घेत आहेत. सर्वच पक्षांनी उमेदवारांची यादी निश्चित करण्याचे काम सुरू केले असले, तरी काँग्रेस यात बाजी मारेल, अशी शक्यता आहे. कारण काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी आज कणकवलीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत १७ सप्टेंबर रोजी उमेदवारांची पहिली यादी घोषित करणार असल्याचे सांगितले.
राणे यांनी आपण कुडाळमधून, तर त्यांचे पुत्र नितेश राणे कणकवलीतून निवडणूक लढविणार आहेत, असे जाहीरही करून टाकले. ते यावेळी निवडणूक लढविणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. परंतु त्यावर खुद्द राणे यांनीच पडदा टाकला. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचे ठरविले असले, तरी त्यांची राष्ट्रवादीसोबतची अंतिम बोलणी अजून झालेली नाही. एकीकडे राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी जागावाटपांत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये समाधान होणार का, हा प्रश्न आहे. मात्र, त्याचा फारसा विचार न करता काँग्रेसने पहिली यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याने पहिल्या यादीत नेमके कोणाची नावे जाहीर होतील, या बाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. शिवसेना-भाजप युतीबद्दल बोलताना महायुतीचे नेते राज्यात सत्ता परिवर्तनाची भाषा करीत असले, तरी ते सत्तेत येऊच शकत नाहीत. त्यातच उद्धव ठाकरे यांनी तर आपणच मुख्यमंत्री होणार म्हणून मिरवायला सुरुवात केली आहे. परंतु ते तर कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, असेही राणे म्हणाले.
 
Top