बार्शी (मल्लिकार्जून धारूरकर)  वैराग परिसरातील ५७ गावांच्या विकासासाठीच या भागातील भाऊसाहेब काशीद यांना पंचायत समितीचे सभापतीपद देऊन १३ वर्षाच्या सत्तेत तालुक्याच्या सर्वच भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शेळगांव (आर.) येथील सभेत सोमवारी केले.
    शेळगांव (आर.) येथे प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत राऊत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच वासुदेव गायकवाड, वैरागचे सरपंच संतोष निंबाळकर, डॉ.भारत पंके, माजी नगराध्यक्ष विश्‍वास बारबोले, सुभाष डुरे-पाटील, देवा दिंडोरे, ज्ञानदेव गायकवाड, पापाण्णा साळुंके, चांगदेव देवकर, किरण कदम, नाना ताकमोगे, सायबू कदम, राजेंद्र स्वामी, जगन्नाथ गायकवाड, केशव गायकवाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष रविंद्र सपाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
     राऊत म्हणाले, सत्ताधार्‍यांनी ३५ वर्षात तालुक्यातील जनतेला आश्‍वासनाशिवाय काहीच दिले नाही. निवडणूक डोळ्यासमोर दिसली की जनतेची दिशाभूल करायची अन् ङ्गक्त अर्धवट कामांची उद्घाटने करायची हेच त्यांना काम आहे. परंतु मी २००४ ते २००९ दरम्यान आमदार असताना कोट्यावधी रुपयांची कामे केली. त्यातच पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून ५० कोटी रुपयांचा निधी आणला. त्यातील ३० कोटी रुपये वैराग भागातील रस्त्यांसाठी तर वीस कोटी रुपये उत्तर बार्शीच्या विकासासाठी वापरले. तेही या भागात त्यावेळी माझे कार्यक्षेत्र नसताना. हे केवळ पंचायत समितीची सत्ता असल्याने व येथील जनतेच्या प्रेमापोटी केले असे भावनिक उद्गार राऊत यांनी काढले.
    संतनाथ कारखाना स्व.आण्णासाहेब बारबोले चेअरमन असताना सुरळीत चालू होता परंतू दिलीप सोपल चेअरमन झाल्यानंतर कारखान्याला टाळे लागले, याचाही विचार मतदारांनी केला पाहिजे. सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या मालकीच्या संतनाथ कारखान्याची वाट लावल्यानंतर स्वमालकीच्या आर्यन शुगरलाही टाळे लागले. अशी टीका राऊत यांनी यावेळी केली. सत्ताधारी ज्या ज्या संस्थेवर कार्यरत आहेत त्या जिल्हा बँक, दूध संघ, मार्केट कमिटी आदी संस्थांचा कारभार कसा चालतोय याची खातरजमा जनतेने करुन त्यांना जागा दाखवण्याची वेळ आल्याचे राऊत यांनी सांगितले.
    प्रास्ताविकात सरपंच वासुदेव गायकवाड म्हणाले, पालकमंत्री दिलीप सोपल यांनी शेळगांव (आर.) येथील बिरोबा देवाच्या मंदिरासाठी ५ लाखांचा निधी देतो असे आश्‍वासन दिले आणि दोन तीन वेळी मंदिर बांधकामाच्या प्रारंभाचा नारळ ङ्गोडला पण कसलाच निधी आणला नाही. परंतु राऊत यांच्या मार्गदर्शनाने पंचायत समितीच्या माध्यमातून व लोकवर्गणीतून ८ लाख रुपयांची घरकूल योजना, गटार कामासाठी १० लाख रुपये, १० सौर दिवे, १० लाख रुपये प्राथमिक शाळेच्या देखभालीसाठी, १० लाख रु.विठ्ठल मंदिरासाठी, बिरोबा मंदिर बांधकामासाठी ५ लाख रुपये तर गणेश मंदिरासाठी २ लाख रुपये आजपर्यंत खर्ची झालेले आहेत. तसेच दारङ्गळ ओढ्यावर चार बंधारेही बांधली आहेत. कोणताही स्वार्थ न ठेवता राजेंद्र राऊत नेहमीच विकासाला प्राधान्य देतात म्हणूनच येत्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना विजयी करण्याचे आवाहन सरपंच गायकवाड यांनी केले.
    धामणगांव येथे झालेल्या सभेस जगन्नाथ जाधव, बाबा शिंदे, दादा मुंगशे, तानाजी ढेकणे, महेश बोधले, हरिकाका लुंगसे, ज्ञानदेव कोरके, प्रङ्गुल्ल देशमुख, शंकर कदम, माणिक ढेकणे, मनोज गरड, अमोल अलाट, भीमसेन अलाट, शहाजी मिसाळ आदी उपस्थित होते.
 
Top