कळंब -  उस्मानाबाद जिल्ह्याची सत्ता ३५ वर्ष एकाच घराकडे असताना विकास होण्याऐवजी जिल्हा भकास झाला कसा? असा सवाल माजी मंत्री तथा तुळजापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मधूकरराव चव्हाण यांनी शिराढोण (ता. कळंब) येथील प्रचारसभेत केला.
उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विश्वास शिंदे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. ६) शिराढोण येथे झालेल्या सभेत चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर टिकेची तोफ डागली. चव्हाण म्हणाले की, आघाडी तुटली हे बरे झाले. आघाडीमुहे आपली फसवणूक होत असल्याने पक्षश्रेष्ठीकडे स्वतंत्र लढण्याचा आग्रह धरला. एकदाचे होवून जाऊ द्या. म्हणुन दोघेही वेगळे झालो. आघाडीत राष्ट्रवादीने सोंग करायचे आणि त्याची झळ काँग्रेसला बसायची. काँग्रेस पक्ष हा कल्पवृक्ष आहे. त्याच्या सावलीखाली अनेकजण मोठे झाले. परंतू ते नंतर पक्षावरच उलटले. या निवडणुकीत त्यांचे बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीत. असे ही त्यांनी विरोधकांना ठणकावले.
ज्या नाडेसमुद्रे यांनी अवघ्या पावणे दोन कोटी रुपयात मराठवाड्यातील सर्वात मोठा पहिला तेरणा सहकारी साखर कारखाना उभारला. त्याची आज या नेत्यांमुळेच मोठी दुरावस्था झाली असून या निवडणुकीत त्यांना धडा शिकविण्याची संधी आली आहे. मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार विश्वास शिंदे यांच्या पाठिशी राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी उमेदवार शिंदे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दौलतराव माने, कळंबचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, संजय घोगरे, जिल्हा बँकेचे संचालक नारायण समुद्रे यांचीही भाषणे झाली. सभेस भागवत धस, धनंजय राऊत, सिद्धार्थ बनसोडे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष खलील सय्यद, सिनेट सदस्य नितीन बागल, महादेव खटावकर, अब्दुलबाशिद काझी, बालाजी बंडगर, विराज पाटील, गणपत शहाणे, नेताजी कणसे, संजय बोंदर, नाना टेळे, राजेंद्र वाघमारे, बाशिद शेख, अनंत लंगडे, आबा शितोळे, नानासाहेब शितोळे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top