बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी विधानसभेच्या बहुचर्चित निवडणुकीत राष्ट्रवादीचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपल यांनी शिवसेनेच्या राजेंद्र राऊत यांचा ५१११ मतांनी पराभव केला. याप्रसंगी बोलतांना दिलीप सोपल म्हणाले, हा विजय माझा एकट्याचा नाही यासाठी अनेक मित्र, सहकारी व कार्यकर्ते झटले आहेत हा त्यांना अर्पण करतो. आजपर्यंत आलेल्या अनेक लाटांना तोंड देऊन त्यांनी लाटांची वाट लावून विजय खेचून आणला आहे. अनेक प्रकारचे प्रयोग करण्यात आले, काहींना फोनवरुन जास्त पळू नका, काहींना धमक्या अशा प्रकारचे विरोधकांचे रडीचे डाव खेळून झाले, लॅपटॉप वरुन मतांच्या अफवांचाही असाच प्रयोग होता जे लोक प्रतिकार करु शकत नाहीत त्यांना मारहाण करुन विरोधकांनी मर्दुमकी गाजवली आहे त्याला मतदारांनी उत्तरही दिले आहे. यापुढील काळात आपण जास्तीत जास्त समाजोपयोगी कामे करणार आहे. अपूर्ण राहिलेल्या विकासाच्या योजना पूर्णत्वास नेणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
    बार्शी विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : दिलीप गंगाधर सोपल (राष्ट्रवादी) ९७६५५, राजेंद्र सुखदेव मिरगणे (भाजपा) १६५०६, राजेंद्र विठ्ठल राऊत (शिवसेना) ९२५४४, गणेश सुरेश शिंदे (बसपा) १७५२, सुधीर विश्वंभर गाढवे (कॉंग्रेस आय) १६५४, इस्माईल मुसा पठाण (अपक्ष) २३०, अतुल बापूराव इटकर (अपक्ष) १५४, प्रविण विनायक गाढवे (अपक्ष) १८०, मोहन बाळासाहेब भोसले (अपक्ष) ३७७, जहॉंगीर याकुब बागवान-येडशीकर (अपक्ष) ४६४, सुवर्णा किशोर शिवपुरे (अपक्ष) ५३४, नोटा (नकार मते) १४४४.
 
Top