उस्मानाबाद - विविध बॅंकांकडे प्रलंबित असणा-या प्रस्तावांबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्यानंतर मंगळवारी बॅंकामार्फत 1 कोटी 65 लाख रुपयांचे कर्जवितरण करण्यात आले. स्वयंसहायता गट, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, विविध महामंडळांकडे व्यवसायासाठी आलेले बेरोजगार, व्यावसायिक यांना हे कर्जाचे वितरण करण्यात आले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी  हा कर्ज वितरण कार्यक्रम पार पडला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रुपाली सातपुते, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाचे डॉ. केशव सांगळे, अग्रणी बॅंक व्यवस्थापक भीमराव दुपारगुडे यांच्यासह विविध बॅंकांचे प्रतिनिधी, महामंडळाचे अधिकारी, लाभार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी कर्ज वितरण करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना सदर कर्जाची वेळेवर परतफेड करण्याचे आवाहन केले. कर्ज रकमेचा उपयोग व्यवसाय वृद्धीसाठी करावा आणि प्रगती साधावी, असे त्यांनी नमूद केले. याचबरोबर, बॅंकांनी याबाबतीत दाखवलेल्या सकारात्मकतेचेही त्यांनी कौतुक केले.
मात्र, ज्या बॅंकांकडे अद्यापपर्यंतही प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यांनी एका आठवड्याच्या आत सदर प्रस्तावांवर काय कार्यवाही केली, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. स्वयंसहायता गटाच्या प्रतिनिधींनी अणदूर येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत खाते उघडण्याबाबत तसेच प्रस्ताव दाखल करुन घेण्याबाबत अनास्था दाखवली जात असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी येत्या 5 नोव्हेंबर रोजी या बॅंकेत खाते उघडण्यासंदर्भात विशेष मेळावा आयोजित करण्याच्या सूचना अग्रणी बॅंक व्यवस्थापकांना दिल्या. तुळजापूर गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.याशिवाय, आजच्या बैठकीला गैरहजर असणाऱ्या विविध महामंडळांच्या प्रतिनिधींची येत्या 5 नोव्हेंबर रोजी बैठक बोलावून त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट्य त्यांनी पूर्ण केले किंवा कसे, याचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी श्रीमती सातपुते यांना केल्या. येत्या 17 नोव्हेंबर रोजी पुन्हा प्रस्ताव मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना कर्जवितरण कार्यक्रम ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.  स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या वतीने सहा स्वयंसहायता बचत गट आणि 13 जणांना वैयक्तिक स्वरुपात कर्जपुरवठा केला. स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखेने 16 स्वयंसहायता बचत गट आणि 5 जणांना वैयक्तिक स्वरुपात कर्जवितरण केले. एकूण 22 स्वयंसहायता गट आणि 24 जणांना हे अर्थसाह्य करण्यात आले. 
 
Top