तुळजापूर : तुळजापूर विधानसभा मतदार संघात बहुरंगी लढत होताना दिसत असली तरी खरी लढत कॉंग्रेसचे मधुकरराव चव्‍हाण व मनसेचे देवानंद रोचकरी यांच्‍यात होत असल्‍याची चर्चा मतदारासह राजकीय वर्तुळात होत आहे.
    तुळजापूर विधानसभा मतदारसंघात गेले तीन वेळेस आमदार असणारे आघाडीचे नेते मधुकरराव चव्हाण यांच्या विजयरथ या वेळेस कोण रोखणार? अशी चर्चा मतदार संघात चालू आहे.
    मागील वेळेस आघाडी विरुद्ध युतीमध्ये लढत झाली. त्यामध्ये चव्हाण यांनी विजय प्राप्त केला. पण आता काँग्रेस पासुन राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी चुल मांडली आहे. सध्या तुळजापूर तालुक्यात जि.प. चे चार सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. सहा सदस्य पंचायत समितीमध्ये आहेत. तर तुळजापूर नगर परिषद मध्ये १९ नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे काँग्रेसला ही निवडणुक जड जाणार आहे. असे वरकरणी चित्र दिसते. त्यातून राष्ट्रवादीने ताकदवान उमेदवार उभा केला. परिवहन मंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांना राष्ट्रवादीने तिकिट देवून पालकमंत्र्यापुढे मोठे आव्हान उभा केले. तर सतत विधानसभा निवडणुक लढविणारे देवानंद रोचकरी या वेळेस मनसे तर्फे आपले नशीब आजमावत आहेत. आता पर्यंत रोचकरी यांनी शेकापकडून निवडणुक लढविली आहे. कधी ते समाजवादी पार्टी तर कधी राष्ट्रवादी पार्टीत तर कधी शिवसेनेमध्ये जावून आले आहेत. आता मनसेकडून उभे आहेत. यावेळी भाऊ येणार अशी चर्चा ग्रामीण भागात जोरात चालू आहे. महायुती तुटल्यामुळे भाजप व शिवसेना यांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभा केले आहेत. भाजपाकडून संजय निंबाळकर उभा असुन मोदी लहर त्यांना विजयी करेल अशी आशा भाजपमधील कार्यकर्त्‍यांमध्ये आहे. पण तालुक्यातील डझनभर मंडळी तिकिटासाठी संघर्ष करीत होते. त्यामुळे भाजपामध्ये नाराजी दिसुन येत आहे. त्यामुळे भाजपामधील वाट मिटला तर निंबाळकर यांना निवडणुक सोपी जाईल. तसेच शिवसेनेकडून उस्मानाबाद येथील सुधीर पाटील यांना तुळजापूर येथून उमेदवारी दिली आहे. तालुक्यात सेनेचा एक जि.प. सदस्य आहे. तसेच गणेश सोनटक्के, एस.के. कदम, शाम पवार, शामल वडणे, कमलाकर चव्हाण असे प्रमुख मंडळी आहेत.
    लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवारीचे काँग्रेसने काम केले नाही म्हणुन त्यांना पराभव पत्कारावा लागला त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी त्यांनी चंग बांधला.
    सर्व बाबी पाहता चव्हाण यांना हे निवडणुक खडतर आहे असे वाटत असले तरी मागील पाच वर्षी पासुन चव्हाण यांनी तालुक्यातील अनेक विकासकामे केली आहेत. शेततळे, पाझर तलाव, गारपीट मदत, मजूरांना कामे, अन्न सुरक्षा योजना, राजीव गांधी आरोग्य योजना, चांगल्या प्रकारे राबविल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनता पुन्हा त्यांना संधी देणार असे वाटते. उलट त्यांच्या विरोधी मतांमध्ये फाटाफुट झाली आहे.
    मतदानास केवळ १३ दिवस उरले असुन हे सर्व उमेदवार कोणत्या पद्धतीने मतदार राजास आपल्याकडे आकर्षित करतात, कोण कोणत्या उपाय योजना करणार? मतदार बंधू हे जागृत झाले असुन अशा कोणत्याही लोभास बळी न पडता योग्य तोच उमेदवार निवडतील. सध्या तर तालुक्यातील दोन मोठे प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचे आहेत.
    २१ टी.एम.सी. पाणी, रेल्वे प्रश्न (सोलापूर ते जळगाव) हे गेल्या पन्नास वर्षापासुन रेंगाळत आहेत. जिल्ह्यातील एकाही नेत्याने रेल्वेचा प्रश्न सोडण्यास समर्थ ठरले नाहीत. यामुळे उभे असलेले उमेदवार या प्रश्नाकडे प्राधान्य देतील का? केवळ आश्वासनाने काम होत नसते. त्यामुळे ही निवडणुक उमेदवारांसाठी फारच प्रतिष्ठेची असुन मतदार राजा कोणाला पसंती करेल ते पाहण्यासाठी १९ ऑक्टोंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे.
 
Top