तुळजापूर :- कुंकवाची मुक्त उधळण करीत, "आई राजा उदो, उदो'च्या जयघोषात सूर्योदयाच्या पहिल्या किरणांत शक्तिदेवता तुळजाभवानीचा सीमोल्लंघनाचा सोहळा उत्‍साहात पार पडला. यावेळी संबळाचा कडकडाट आणि हलगी, ढोल, ताशाने जोश आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. 
शनिवारी पहाटे ५.३० वाजता श्री तुळजाभवानीची मूर्ती १०८ साड्यांमध्ये लपेटून पारंपरिक सीमोल्लंघनासाठी बऱ्हाणपूरच्या पालखीमध्ये ठेवण्यात आली. यावेळी महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, पुजारी अॅड. धीरज पाटील, सचिन पाटील, कैलास पाटील, शशिकांत पाटील, दिग्विजय पाटील, राजेश मलबा, विकास मलबा, सुधीर कदम यांच्यासह किशोर गंगणे, धनंजय लोंढे, प्रा. संभाजी भोसले, कुमार टोले यांच्यासह पुजारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
"आई राजा उदो उदो'चा गगनभेदी जयघोष, सूर्योदयाच्या पहिल्या किरणांत नगरच्या मानकऱ्यांनी पालखी मार्गावरून मूर्तीसह प्रदक्षिणा मारली. यावेळी उपस्थित भाविकांनी कुंकवाची मुक्त उधळण करून तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. 
दरम्यान, सीमोल्लंघनाच्या वेळी देवी पिंपळाच्या पारावर येते. येथे नैवेद्य दाखवून मातेची आरती करण्यात आली. यानंतर देवी सिंह गाभाऱ्यात श्रमनिद्रेसाठी नगरच्या पलंगावर विसावली. यानंतर वाजता नगरच्या पलंगावरच चरणतीर्थ होऊन देवीला सुवासिक तेलाने अभिषेक घालण्यात आले. तत्पूर्वी सीमोल्लंघनानंतर मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते मंदिराचे सेवेकरी, मानकरी तसेच नगरचे पालखीवाले यांचा भरपेहराव आहेर देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार काशीनाथ पाटील, व्यवस्थापक तहसीलदार सुजीत कोल्हे, दिलीप नाईकवाडी, नगराध्यक्षा जयश्री कंदले यांच्यासह मंदिर संस्थानचे कर्मचारी, पुजारी उपस्थित होते. 

 
Top