बार्शी  (मल्लिकार्जुन धारुरकर)  अमित शहा महाराष्ट्रात येऊन सगळ्यात जास्त बलात्कार महाराष्ट्रात झाल्याचे भाष्य करतात अन गुजरातमध्ये महिलांच्या फोनचे टॅपिंग केल्याचे विसरुन जातात. महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे, शाहू फुले आंबेडकर यशवंतराव यांचा वारसा असलेला आहे. माझ्या आबाने (आर.आर.) पोलिसांकडून सहा तासांत आरोपी पकडले आणि न्यायालयाकडून त्यांना फाशीची शिक्षादेखिल सुनावण्यात आली. महाराष्ट्र हा बलात्कारातील आरोपीला फाशी देणारा देशातील पहिले राज्य आहे. महाराष्ट्रात पोलिसांच्या भरतीमध्ये महिलांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. महिलांच्या फोनचे टॅपिंग करणार्‍या अमित शहाची नजर खराब आहे असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
    राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी दिलीप सोपल, विक्रम सावळे, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे, नागेश अक्कलकोटे, ऍड्.विकास जाधव, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल यांच्या पत्नी उज्वला सोपल, नगरसेविका मंगलताई शेळवणे, शोभा पाटील, रिता लोखंडे, मंदा काळे, संगीता मेनकुदळे, उषा गरड, अस्मिता लंकेश्वर, गोकर्णा डिसले, अरुणा परांजपे, सौ.बंगाळे, सौ.पवार, सौ.पठाण, आदी उपस्थित होते.   
    महाराष्ट्रातील असंख्य जिल्हे असले तरी शरदचंद्रजी पवार यांच्यावर उदंड प्रेम करणारा हा सोलापूरच आहे. सुखात आणि दु:खातही या जिल्ह्यानेच पवार साहेबांना साथ दिल्याने या जिल्ह्यातील जनतेसमोर नतमस्तक होण्याची सतत इच्छा होते. भाजपाच्या कुठे नेऊ ठेवलाय या जाहीरातीमध्ये असलेला विरोधाभास सांगतांना घराघरामध्ये आलेल्या टिव्ही, प्रत्येकाच्या हातामध्ये आलेला मोबाईल अगोदर पहा. नळातून हवा येत असल्याची जाहीरात दाखवितांना त्या महिलेने दोरीवर लटकविलेली धुतलेली कापडं कशानं धुतली?, पंतप्रधान सारख्या दर्जाचा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या प्रचारासाठी येतो, अजीतदादा पवार यांच्या विरोधात बारामतीमध्ये, तासागावमध्ये आर.आर.पाटील (आबा) यांच्या विरोधात, भुजबळ साहेबांच्या विरोधात अशा २५ सभा घेण्याची गरज का पडली? यावरुन आपल्या महाराष्ट्राची किती मोठी ताकद आहे आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या उमेदवारांची किती मोठी राजकिय ताकद आहे याचा अभिमान असायला हवा. परंतु यामध्ये मोदी दिलीपभाऊंना (दिलीप सोपल) कसेकाय विसरले? ते देखिल मोठ्या राजकिय ताकदीचे उमेदवार आहेत हा प्रश्‍न पडतो.
     मोदीशेठ यांना पंतप्रधानपद मानवलं असल्याचं त्यांच्या तब्बेतीवरुन दिसते. आपला बाईचा स्वभाव आहे, त्यामुळे मनात काही रहात नाही, पंतप्रधानपदी असलेल्या मोदीशेठ यांनी आपल्या ऑफिसला टाळे लावून महाराष्ट्रात मते मागत असल्याने खंत वाटते. पाकीस्तानकडून आपल्या देशातील सैनिकांवर गोळीबार सुरु आहे. ५ मुलं शहीद झाली अन हे मोदीशेठ गल्ली बोळात सभा घेऊन मते मागत आहेत त्यापेक्षा तिकडे सांत्वन करणे गरजेचे होते. देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्रीदेखिल नाही. अन हे मोदीशेठ म्हणतात मुंढे साहेब असते तर इकडे येण्याची गरज नसती यावरुन भाजपात कामाचा एखादा माणूस देखिल नसल्याचे दिसून येते. यानंतर जिल्हा परिषदा, नगरपालिकेच्या निवडणुकांनाही यावे लागेल. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देखिल महिला आहेत, समाजकल्याण विभागातही महिलाच आहे. याचा सार्थ अभिमान आहे, बिच्चारे पुरुष कोपर्‍यात बसल्याचे चित्र दिसते. शरद पवार साहेबांमुळे ५० टक्के महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी दिली आहे. महिलांनी एकदा मनात रंग पक्का केल्याप्रमाणे या ठिकाणी सोपल यांना विजयी करण्याचे महिलांनी ठरविले आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले.
 
Top