ग्रामदैवत श्री खंडोबाच्या पावन भूमीत गावातील स्वातंत्र्य सैनिकांपासून प्रेरणा घेवून अगदी बालपणापासूनच समाजकारण व राजकारण करण्याची विशेष आवड होती. आजपर्यंत यशाची अनेक शिखरे त्यांनी पादाक्रांत केली आहे. ना. मधुकररावजी चव्हाण यांचा ओढा आजही अणदुरच्या मातीशी असल्याचे ठळकपणे दिसते. 
     मीत भाषा, कर्तव्य कठोर व सह्दयी असलेले जेष्ठ नेते ना. मधुकरराव चव्हाण यांचा जीवनपट उलगडताना त्यांच्या राहणीमानावर अस्सल ग्रामीण जीवन शैलीची छाप असल्याचे दिसते. कोणत्याही भपकेबाज पणाला थारा न देता सर्वसामान्य नागरिकांमध्ये लिलया मिसळण्याची किमया अतिशय कृशलतेेने त्यांनी साधली आहे. राज्य भरातील दौरे, कार्यक्रम आटोपून आल्यानंतरही त्यांची दिनचर्या आश्‍चर्यकारक आहे. पहाटे पाच वाजता लवकर उठल्यानंतर जवाहर विद्यालयाच्या पटांगणावर जावून फेरफटका मारुन घरी येणे, आंघोळ आटोपून खंडोबाच्या दर्शनासाठी पायी जाणे, बालपणापासुनची सवय आजही जशीच्या आहे. दर्शनासाठी घरातून निघाल्यापासून सर्व परिचितांना नमस्कार घालून त्यांची खुशाली उचारणे, मुलाबाळांची चौकशी करणे, शेतात काय पेरले आहे? पिकाला पाणी पुरते का? मुलांना उच्च शिक्षणासाठी काय अडचण आहे का? मुलीचे लग्न जमले का? आदी चौकशा करीतच त्यांचे चालणे सुरु असत. मोठेपणाचा अभिनिवेश बाजूला ठेवून भेटेल त्यांची चौकशी करणे, स्वत: होवून परिचितांच्या घरी जाणे, मग तो छोटा कार्यकर्ता आहे की मोठा ही त्यांच्यासाठी गौण बाब आहे. मध्येच एखादा नागरीक अडचण घेवून आला की, संबंधित यंत्रणेला त्यांच्या कामासंबंधी फोन करुन समोरच्याचे समाधान करुन त्याचे काम मार्गी लावणे, ही कामाची आगळीच पध्दत असल्याचे तुळजापूर तालुक्यातील नागरिकांनी सलग चार वेळा आमदार पदाच्या खुर्चीवर बसविले आहे. गावातील खंडोबाच्या मंदिरात किंवा जेष्ठ सहकारी कै. निळकंट अण्णा आलुरे, दिवंगत मित्र कै. शिवणप्पा मुळे, आण्णाराव मुळे, आप्पण्णा आलुरे, हणमंत कोळी पैलवान, गुराप्पा मुळे यांच्या घरी जाणे-येणे असो, अणदुरचा दिल्ली दरबार (त्यातही काही सहकार्‍यांचे निधन झाल्याने तो आज बंद पडला आहे) येथे जाणे-येणे असो, कोणताही शासकीय किंवा खासगी सुरक्षा रक्षक, लवाजमा सोबत नेत नाहीत. नेहमी नागरिकांच्या गराड्यातच त्यांचे चालणे सुुरु असते. मंदिरात जावून दर्शन घेतल्यानंतर जवाहर विद्यालयातील शिक्षकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, संस्थेचे अध्यक्ष या नात्याने विद्यालयाच्या बहुतांश कार्यक्रमाला हजर राहून मार्गदर्शन करतात. यासर्व गोष्टी आटोपून शेतावर जावून शेतीतील कामाचे नियोजन करणे, शेतामध्ये रोज नित्य नवे प्रयोग राबविणे, इतरांना सांगणे, शेतकर्‍यांच्या कोणत्याही अडचणीला धावून जाणे, ही सोडवणूनच पुढील कामास जाणे, हा त्यांचा अतिशय आवडीचा छंद आहे.
         शेतावरुन घरी येवून जेवण आटोपून तालुका व जिल्हा कार्यालयातील कामकाजासाठी जावून कामकाज पाहणे, मतदार संघातील विविध गावात अनेक कार्यक्रम, कार्यकर्त्यांच्या घरातील शुभकार्यात सहभागी होणे, काही कार्यकर्ते, नातेवाईक यांच्या दु:खद घटना घडल्या असतील तर जावून त्यांची भेट घेवून त्यांचे सांत्वन करणे, याशिवाय त्या-त्या गाव पातळीवरील अडचणी समजून घेणे, त्यासाठी निधी उपलब्ध करुन देणे, सरकारी कार्यालयामध्ये भेट देवून अधिकार्‍यांच्या अडचणी सोडविणे अशी नानाविध कामे दिवसभर सुरु असतात. साहेब अणदुरला आलेत आणि राईस मिलच्या कट्‌ट्यावर बसले नाहीत, असे आजपर्यंत तरी घडले नाही. असे घडल्याचे एैकीवातही नाही. दिवसभराची कामे आटोपून राईस मिलच्या कट्‌ट्यावर गावातील सहकारी मित्र माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी, महोदवप्पा आलुरे, सुधाकर मोकाशे, भारत पाटील (कस्तुरे), विठ्‌ठल मोकाशे आदी मित्र परिवरात दिवसभर घडलेल्या घटनांची उजळणी करुन त्यातील अदभूत घटना, विनोदी किस्से सांगण्याची त्यांना विशेष आवड आहे. जिल्हाभरातील दिवसभराच्या नवनवीन घडामोडी सांगून गप्पा रंगायच्या. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी समोरच असलेल्या गाढवेंच्या हॉटेलमधील शेवचिवडा, त्यावर बारीक चिरलेला कांदा सहकार्‍यांसमवेत मनमुरादपणे खाण्याचा आनंद लुटतात. खावून झाल्यानंतर मागील आयुष्याचा उलगडा करताना हळुच आठवणींना सुरुवात होते. आपण पाहिलेले त्यावेळेचे गाव, आजची परिस्थिती, त्यावेळचे तात्विक राजकारण व आजचे संधी साधू राजकारण यामुळे थोडेशे हळवे होवून खेद व्यक्त करतात.
    गावातील प्रत्येक कुटुंबाशी जवळीक असून त्यांची अडचणी ही आपली अडचण समजून काम करण्याची त्यांची हतोटी निराळीच आहे. बालपणापासून त्यांच्या समवेत असलेल्या सवंगड्यामध्ये रमणे, त्यांच्यातील एक सामान्य नागरीक होवून जुन्या दिवंगत सहाकार्‍यांच्या आठवणीने सदगदीत होतात. सोलापूरात सर्व सोयींनी युक्त अशी निवास व्यवस्था असतानाही गावातील नागरिकांच्या प्रेमापाटी अणदूर येथेच राहणे पसंत करतात. यावरुनच त्यांचे गावावरील प्रेम स्पष्ट होते. त्यांना वाचनाचा प्रचंड छंद असून अनेक ग्रंथाचे वाचन त्यांनी केले आहे. ज्या ठिकाणी भाषणाला जायचे आहे. तिथे जाताना पूर्व तयारी करुच जातात. के त्यांच्या आतापर्यंतच्या भाषणावरुन दिसते आहे. म्हणूनच त्यांना परिसरातील लोक ‘अण्णा’ या नावाने ओळखतात. परिसरातील नागरीक गेली पन्नास वर्षापासून त्यांच्यावर प्रचंड प्रेम करीत आहेत. त्यांच्या प्रेमापोटीच त्यांचा ओढा गावाकडे, गावातील नागरिकांकडे असल्याचे त्यांच्या जीवन पद्धतीवरुन दिसत आहे. लाल दिव्याच्या गाडीतून फिरणारा हा असामान्य माणूस सामान्य माणसांमध्ये मिसळून जगतो आहे. हाच त्यांचा मोठेपणा आहे. रात्री झोपताना दिवसभर केलेल्या कामाचे टिपण करणे, नियमित ग्रंथवाचन करण्यास त्यांना विशेष आवडते. आजपर्यंत त्यांनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही. त्याउलट विरोधकांच्या समस्यासुद्धा ते प्राधान्याने सोडवितात. अत्यल्प शिक्षण असतानाही केवळ विलक्षण बुद्धीमत्तेच्या व जिद्दीच्या जोरावर आजपर्यंतचे राजकारण यशस्वी झाले आहेत. प्रचंड स्मरणशक्ती व मराठीसह इंग्रजी, हिंदी व कन्नड या भाषावर त्यांचे प्रभुत्व आहे. वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत परिसरातील कुस्त्यांचे फडही त्यानी गाजवले आहेत.
- शाश्‍वत गुड्ड
 
Top