तुळजापूर -:  "आईराजा उदो उदो, सदानंदीच्‍या उदो उदो' च्या जयघोषात होमकुंडावर अजाबलीचा पारंपरिक धार्मिक विधी पार पडला. त्यानंतर घटोत्थापनाने श्री तुळजाभवानी मातेच्‍या नवरात्रोत्सवाची सांगता झाली. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, अश्विन पौर्णिमेपर्यंत तुळजापुरात दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरूच असतो. नऊ दिवसांत पंधरा लाख भाविक नवरात्रोत्सवात पंधरा लाखांहून अधिक भाविकांनी श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतले.
    तुळजापूर येथील श्री तुळजाभवानीच्या नवरात्रातील महत्त्वाचा दिवस म्हणजे दुर्गाष्टमी. गुरुवारी सकाळी ते दुपारी १२ वाजून १० मिनिटांपर्यंत वैदिक होम हवन करण्यात आले. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, त्यांच्या सुविद्य पत्नी प्रियंका आणि मातोश्री प्रमिला यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तर शुक्रवारी दुपारी १२ वाजता होमावर अजाबलीचा धार्मिक विधी पार पडला. यावेळी महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, पूजेचे मानकरी प्रशांत संभाजीराव पाटील, व्यवस्थापक तहसीलदार सुजित नरहरे, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, सुधीर कदम, किशोर गंगणे, सचिन पाटील, कैलास पाटील, राजेश लोंढे, प्रा. संभाजी भोसले, दिनेश परमेश्वर, राजामामा भोसले, बापू क्षीरसागर आदी उपस्थित होते.
    होमकुंडावर पारंपरिक पध्दतीने ब्रह्मवृंदानी दुर्गा सप्तशतीच्या १३ व्या अध्यायाचे वाचन करून मंत्रोपचार करण्यात आला. सप्तशती पाठ, तुळजाभवानी सहस्त्रनाम पाठ, दुर्गा सहस्त्रनाम पाठ, नवग्रह या सर्वांची आहुती तसेच होमावर कोहळा बलिदान करण्यात आला. याचवेळी कोल्हापूर संस्थान होमाचा मकरंद प्रयाग यांनी विधीवत प्रारंभ केला तर हैदराबाद संस्थानच्या होमाचा प्रारंभ कुंदन कोंडो यांनी केला. या होमासही कोहळा अपूर्ण करून पूर्णाहुती देण्यात आली. पहाटे वाजता चरणतीर्थ होऊन नित्योपचार पूजेनंतर दर्शनास सुरुवात झाली. सकाळी वाजता सुरुवात झालेली अभिषेक पूजा वाजता संपवण्यात आली. त्यानंतर तुळजाभवानीस महावस्त्रालंकार घालण्यात आले. पुजारी प्रशांत पाटील यांनी अंगारा काढला. सिंदफळ येथील गजेंद्र लांडगे यांचे अजाबलीचे मानाचे बोकड शहरातील प्रमुख मार्गावरून वाजत-गाजत मंदिरात १२ वाजता दाखल झाले.
    पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अप्पर पोलिस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपविभागीय पोलिस अधिकारी मोहन विधाते, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे यांनी कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
 
Top