उस्मानाबाद :- निवडणुकीची तयारी करताना सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करणे गरजेचे आहे. निर्भिड आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका होऊन मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जागरुक राहा, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाच्या सर्वसाधारण निरीक्षकांनी आज निवडणूक यंत्रणेला दिल्या.
उमरगा आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे सर्वसाधारण निरीक्षक डी.के. मिश्रा आणि उस्मानाबाद आणि परंडा मतदारसंघाचे सर्वसाधारण निरीक्षक विजय बहादूर सिंग यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विषयक कामांचा आढावा घेतला. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे, चारही मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह विविध कक्षांच्या प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती. 
यावेळी चारही मतदारसंघात निवडणूकविषयक तयारीचा आणि आतापर्यंत केलेल्या कामांचा श्री. मिश्रा आणि श्री. सिंग यांनी आढावा घेतला. निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी किती पोलीस मनुष्यबळ लागणार आहे, त्यादृष्टीने काय नियोजन करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ किती दिवसांत उपलब्ध होईल, त्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला आहे का, याचा त्यांनी आढावा घेतला. प्रत्येक मतदारसंघात आचारसंहितेचे पालन होईल आणि कायदा व सुव्यवस्था चांगली राहील, यासाठी समन्वयाने कामे करा आणि मतदारांना मतदानासाठी निर्भिड वातावरण राहील, असे शाश्वत वातावरण तयार करा, असे त्यांनी सांगितले.
मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नियुक्त कर्मचारी-अधिकारी यांना परिपूर्ण प्रशिक्षण द्या, असे  निर्देश त्यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पायाभूत सुविधा असतील याची खातरजमा करा अथवा भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांप्रमाणे तेथे व्यवस्था करा, असेही श्री. मिश्रा आणि श्री. सिंग यांनी सांगितले.
जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील संवेदनशील मतदानकेंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त असेल तसेच मतदारांना सुरक्षित वातावरण असेल, याची खात्री करा. असामाजिक तत्वांचा बंदोबस्त करण्यासाठी चोख पावले उचलण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 
प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचा क्षेत्रनिहाय आराखडा, दळणवळण आणि मार्गांचा आराखडा अद्यावत करण्याचे निर्देशही दोन्ही निवडणूक निरीक्षकांनी दिले. 
 
Top