नळदुर्ग :- हेलिकॉप्टरच्या अपघातात मृत झालेले कॅप्टन अविनाश यशवंत सोमवंशी (पाटील) यांच्या पार्थिवावर गुरुवारी बोरगाव (तुपाचे, ता. तुळजापूर) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईक आदी उपस्थित होते.
    अविनाश सोमवंशी यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांचे मूळ गाव असलेल्या बोरगावावर अवकळा पसरली. बुधवारी गुरुवारी एकाही घरात चूल पेटली नाही. सर्वत्र दु:खाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी तीन वाजता गावात पार्थिव आणण्यात आले. पार्थिव गावात आणल्यानंतर सर्वच गावकऱ्यांच्या अश्रूंचे बांध फुटले. प्रथम त्यांच्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. नंतर काही वेळाने त्यांच्या शेतात पार्थिव नेण्यात आले. तेथे कर्नल जी. एस. सबेरिया, कर्नल हितेंद्र मराठे, अमित दळवी, कॅप्टन अमित विक्रम, मेजर योगेश हिरेकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून ५.३० वाजता सलामी दिली. शासनाच्या वतीने तहसीलदार काशीनाथ पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर. टी. ससाणे यांनी आदरांजली अर्पण केली. "भारतमाता की जय अशा घोषणा देत कॅप्टन अविनाश यांचे चुलते रघुनाथ सोमवंशी यांनी चितेला भडाग्नी दिला.
    यावेळी माजी पालकमंत्री आमदार मधुकरराव चव्हाण, माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, देवानंद रोचकरी, गणेश सोनटक्के यांच्यासह बरेली, औरंगाबाद येथील सेना दलातील अधिकारी सुमारे २० हजार नागरिक उपस्थित होते.
    कॅप्टन सोमवंशी यांचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या पत्नी सोनाली, वडील यशवंत, आई जनाबाई, बहीण ज्योती, सासरे बाळासाहेब शिंदे (रा. उस्मानाबाद) आदी नातेवाइकांना शोक अनावर झाला होता. त्यांचा गगनभेदी आक्रोश पाहून तर उपस्थितांचे मन हेलावले. अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या नागरिकांनाही आपले अश्रू रोखता आले नाहीत
 
Top