उस्मानाबाद – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत जीवनोन्नती अभियानाच्या वतीने येथील जिल्हा परिषदेच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या आद्या दीपावली महोत्सवास गुरुवारी सुरुवात झाली. यात जिल्ह्यातील 35 महिला बचत गटांनी सहभाग घेतला असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र तावडे,  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक रुपाली सातपुते आदींच्या उपस्थितीत या महोत्सवास सुरुवात झाली.
      महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटाची चळवळ वाढविण्याच्या आणि त्या माध्यमातून महिलांचा आर्थिक आधार सबळ करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या आवारात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 
    यावेळी बचत गटांचे चांगले काम सुरु असल्याबाबत न्या. तावडे यांनी समाधान व्यक्त केले. आद्या दीपावली महोत्सव हा चांगला उपक्रम आहे. त्याच्या माध्यमातून बचत गटांच्या महिलांच्या उत्पादनाला चांगले व्यासपीठ मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले. बचत गटांची उत्पादने चांगल्या पद्धतीने राज्य व राष्ट्रीय पातळीवर जावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बचत गटाचा विकास म्हणजे परिवाराचा आर्थिक विकास असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सामाजिक विकासासाठी सुद्धा ही चळवळ उपयुक्त असल्याचे नमुद केले. सामाजिक विकासासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे बचत गट चळवळ आहे. दर महिन्याला असा उपक्रम आयोजित करावा, अशी सूचना डॉ. नारनवरे यांनी केली.  बचत गटांमुळे आर्थिक उलाढाल चांगल्या प्रकारे होऊन त्याचा लाभ या गटातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यात होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी, असे त्यांनी आवाहन केले.
पोलीस अधीक्षक त्रिमुखे यांनी आद्या दीपावली महोत्सव हा ब्रॅंड व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. बचत गटांच्या महिलांनी फूड फेस्टीवल आयोजित करण्याबाबत त्यांनी सूचना केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी जिल्ह्यातील विविध विभागांचे समावेशक प्रकल्प जिल्हा परिषद राबवित असल्याचे सांगितले.  बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे मार्केंटींग केले तर त्याचा नफा हा त्यांच्या विकासासाठी असेल. त्या महिला स्वताच्या पायावर उभ्या राहतील. ही एक प्रकारे स्वप्नपूर्ती असल्याचे त्या म्हणाल्या.
प्रकल्प संचालक श्रीमती सातपुते यांनी  प्रास्ताविकात हा महोत्सव आयोजनामागील भूमिका समजावून सांगितली.  पाच हजार 372 बचत गटांच्या माध्यमातून 66 हजार महिला जोडल्या गेल्याचे त्यांनी सांगितले. हा महोत्सव तीन दिवस चालणार असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
दीपावलीत प्रत्येक कुटुंबाला लागणाऱ्या पणती, आकाश कंदील, चकली, चिवडा, लाडू, शेव, फराळाचे विविध पदार्थ, रांगोळी, खवा, पेढा, आवळा कॅंडी, विविध मसाले, कपडे, ज्वेलरी, पुजेचे साहित्य, शोभेच्या वस्तू आणि विविध खाद्य पदार्थ या महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांनी विक्रीसाठी ठेवले आहेत.
 
Top