तुळजापूर - युती तुटावी ही कदाचित तुळजाभवानीचीच इच्छा असावी, तसे संकेत त्याचवेळी मिळाले होते. त्यामुळे  भाजपवाले काय युती तोडणार अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. ठाकरे यांनी भाजपची तुलना अफजल खानाच्या फौजेशी केली. महाराष्ट्र जिंकायला अफजल खानाची फौज आलीये, नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी आले आहेत. त्यांना मी भुईसपाट करणार अशी घणाघाती टीका उद्धव यांनी तुळजापूर येथील जाहिर सभेत केली. 
       शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरमध्ये सभा पार पडली. जिल्ह्यातील शिवसेनेचे उमेदवार सुधीर पाटील, ओमराजे निंबाळकर, ज्ञानराज चौघुले, आणि ज्ञानेश्वर पाटील या उमेदवारांसाठी ही प्रचारसभा झाली.   यावेळी बोलताना उध्‍दव ठाकरे म्‍हणाले विधानसभेवर भगवा फडकायचा असेल तर तुळजापुरात भगवा असावा असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. पण ही जागा भाजपकडे गेली तर काय? असा प्रश्न मला होता. तरी कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. त्याचवेळी युती तुटल्याची बातमी मिळाली. त्यामुळे मी भरभरून द्यायला तयार असताना युतीत काय अडकता असा संकेतच जणू आई तुळजाभवानीने मला दिला. म्हणून युती तुटावी ही भाजपची नव्हे तर तुळजाभवानीचीच इच्छा असावी असे मला वाटते.
  ज्यात सत्ता मिळवण्यासाठी सगळेच मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान, गृहमंत्री सगळेच सभांचा धडाका लावत आहेत. तुम्ही मला सत्ता द्या म्हणजे पाहा मी किती महाराष्ट्र तयार करतो, पाहा मी किती तुकडे करतो, असे ते म्हणत असावेत. गोपीनाथ मुंडे असते तर युतीची अशी अवस्था झाली नसती. ते युती जोडून ठेवणारे होते. त्यामुळे मुंडे महाजन कुटुंबाशी ऋणानुबंध जपणार आहे.
  आतापर्यंत अनेकांनी सत्ता उपभोगली पण तुळजापूरचा विकास करण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. राज्याचा विकास करण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. आम्ही समाजातील सगळ्यांचा विकास तयार करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार मी तुळजापूरचा आणि राज्याचाही विकास करणार आहे. त्या सर्व बाबी मी वेळोवेळी सर्वांना दाखवल्या आहेत. सगळ्या योजना माझ्या हातात तयार आहेत. त्या तुम्ही तुमच्या हातात घ्यायच्या की नाही, ते तुम्ही ठरवायचे आहे. त्यामुळे मला तुमच्याकडून राज्यात विजयाचे वचन हवे आहे.

 साभार दिव्‍य मराठी
 
Top