बार्शी - प्रामाणिकपणे काम करणार्‍या, कोणताही डाग नसलेल्या कॉंग्रसमधून उभे असलेल्या सुशिक्षीत उमेदवार सुधीर गाढवे यांनाच लोक निवडून देतील असे प्रतिपादन कॉंग्रेसचे जिल्हा चिटणीस गोविंदराव पंके यांनी व्यक्त केले.   
    रऊळगाव ता.बार्शी येथे भेटी घेऊन मतदारांशी चर्चा करतांना ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे उमेदवार सुधीर गाढवे, सुधाकर भोसले, ज्ञानदेव गोरे, भारत भोसले, व्यंकटेश भोसले, गोपाळ भासले, नाना पाटील, सुरवसे सर, सोमनाथ भड, पवन लाटे, इंद्रसेन भड, सचिन नाईकवाडी आदी उपस्थित होते. तालुक्यातील रातंजन, मुंगशी (ख.) मालेगाव, रुई, भालगाव, मिर्झनपूर, आळजापूर, कासारी, भांडेगाव, सारोळे, गौडगाव आदी भागातून गाठीभेटी घेऊन रऊळगाव येथील ग्रामस्थांच्या भेटी घेण्यात आल्या. पंके म्हणाले, आतापर्यंत अनेक भूलथापांना जनता फसली आहे, निवडणुका आल्यावरच जनतेची आठवण करणार्‍या उमेदवारांना आता जनता मतदान करणार नाही. आघाडीमध्ये हवी तशी चर्चा न झाल्याने वेगवेगळे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर कॉंग्रेसमधील निष्ठावंत सुधीर गाढवे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यासाठी व पाहीजे तसा प्रचार करण्यासाठी शासनाने अत्यंत कमी कालावधी दिला असला तरी कार्यकर्ते मोठ्या जोमाने प्रचार करुन आपला निश्‍चितपणे विजय होणार आहे. अच्छे दिन आयेंगे म्हणून जनतेची फसवणूक करणार्‍या मोदी सरकारचे शंभर दिवस उलटून गेले परंतु कोणतेही ठोस कामे झाली नाहीत. भूलथापांचे दिल्लीचे राजकारण आता सर्वांना माहिती झाले आहे.
    याप्रसंगी बोलतांना कॉंग्रेसचे उमेदवार गाढवे म्हणाले, सध्याच्या जमान्यात तरुणांचा जास्त वेळ हा मोबाईलवरील व्हॉटसअप, फेसबुक आदींच्या वापरामध्ये जात आहे. यावरुन होत असलेल्या प्रचारात खरे खोटे काय याचा खुलासा करण्यासाठी कोणी वेळ देत नाही. यामध्ये जाणीवपूर्वक राजकिय बदनामी करण्यात येऊन राजकिय स्वार्थ साधण्याचे काम विरोधातील पक्षाकडून होत असतो. जुन्या माणसांना अशा प्रकारच्या राजकारणाची माहिती आहे व त्यांच्याकडे असे अनेक अनुभव आहेत. कॉंग्रेस पक्ष हा ध्येय धोरणांनी चा
लणारा पक्ष आहे, सेनेचा कारभार हा मुंबईतून चालतो तर भाजपाचा अहमदाबाद येथून चालत आहे. रऊळगाव सारख्या गावातील विकासासाठी कोणी विचार करणार नाही. भाजपा हा मुंबईची आर्थिक राजधानी हलविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पूर्वीपासून मुंबईत असलेल्या रिझर्व बँकेला हलवून महाराष्ट्राला आर्थिक विकलांग करण्याचा प्रयत्न मोदींच्या भाजपाकडून होत आहे अशा डावपेचाचा विचार महाराष्ट्रातील जनतेला करावा लागणार आहे. कॉंग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे, समाजवादाचा विचार घेऊन लोककल्याणकारी कॉंग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून दिल्याने महाराष्ट्र राज्याचा विकास होणार आहे.
 
Top