बार्शी (मल्लिकार्जून धारूरकर) येथे नव्याने सुरु झालेल्या अतिरिक्त सत्र न्यायालयात आलेल्या प्रकरणातील व्यापार्‍याची फसवणूक प्रकरणी दिलेल्या आदेशात अनिल श्रीधर तोडकरी यांचा अटकपूर्व अर्ज मंजूर करुन अटकपूर्व जामीनही अंतिमरित्या मंजूर करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एस.डी.अग्रवाल यांनी हा आदेश दिला आहे.
    येथील व्यापारी शब्बीर महंमद तांबोळी यांनी ९ जुलै ते २९ जुलै २०१४ या कालावधीत १ कोटी १९ लाख १० हजार सहाशे चोवीस रुपये २७ पैसे इतकी रक्कम बोगस टिपण दाखवून कमिशन देतो असे सांगून विश्वास संपादन केलेल्या श्रीकांत रंगनाथ फल्ले, आशिष श्रीकांत फल्ले, अनिल श्रीधर तोडकरी यांच्याविरोधात बार्शी पोलिसांत तक्रार केली होती. तक्रारीनुसार बार्शी पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. बार्शी न्यायालयाच्या कामकाजाची सुरुवात झाल्यानंतर पहिला अटकपूर्व अर्ज संशयित अनिल तोडकरी यांनी दाखल केला होता. अॅड .प्रशांत शेटे यांच्‍या मार्फत दाखल केलेल्या अर्जाची नोंद होऊन त्याची प्रथम सुणावणीही झाली. अर्जदाराच्या विधीज्ञांचे युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधिश एस.डी.अग्रवाल यांनी तोडकरी यांचा अटकपूर्व अर्ज मंजूर केला. तपास अधिकारी व सरकारी वकील यांनी त्यांचे म्हणणे सादर केले. दि.२७ ऑक्टोबर २०१४ रोजी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून अर्जदाराच्या विधीज्ञांचा युक्तीवाद न्यायालयाने मान्य करुन अर्ज अंतीमत: मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले. संशयित आरोपी यांचेतर्फे अॅड्.प्रशांत शेटे, अॅड्.शंकर ननवरे, अॅड्.केतन सरवदे, अॅड्.प्रणाली कोरे, अॅड्.झाडे, अॅड्.कापसे यांनी काम पाहिले.
 
Top