उस्मानाबाद -  व्यसनमुक्त भारत, सुदृढ भारत निर्मितीसाठी  व्यसनमुक्त समाज होणे आवश्यक आहे. तेव्हा व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या कार्यात सर्वांनी  योगदान दयावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी केले.
    येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग व येडाई व्यसनमुक्ती केंद्र, येरमाळा यांच्या संयुकत विद्यमाने आयोजित महात्मा गांधी व्यसनमुक्ती सप्ताह- 2014 चे उदघाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रावत  बोलत होत्या.
     यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, जि. प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी  शि. द. बनसोडे, तेरणा महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्रसिद्ध व्याख्याते डॉ. जर्रा काझी, जिल्हा  समाज कल्याण अधिकारी  एस. के. मिनगिरे,  कोषागार अधिकारी राहुल कदम, नेहरु युवा केंद्राचे  जिल्हा समन्वयक मोहन गोस्वामी, येडाई व्यसनमुक्ती केंद्र येरमाळाचे संचालक डॉ. संदिप तांबारे, डॉ. भागवत राऊत,  समाज कल्याण निरीक्षक श्री. कुंभार, रामदास जाधव, दे. वा. चव्हाण आदी उपस्थित होते.
           यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी  रावत म्हणाल्या की, तंबाखु सेवनाने  आपण अनेक  संकटाला आमंत्रण देतो. दारु  व तंबाखु सेवनाने अनेक शारिरीक, मानसिक, सामाजिक दुष्परिणाम होतात. व्यसन हा माणसाचा एक नंबरचा  शत्रू आहे.  लहान लहान व्यसनापासूनच पुढे मोठ-मोठे व्यसन जडून पुढे मनुष्य त्या सवयीचा गुलाम बनतो. त्यातूनच मग या व्यसनाची पूर्तता करण्यासाठी गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा व्यसनापासून  दूर राहण्याचा सल्ला त्यांनी  दिला.
    श्री. पाटील म्हणाले की,  समाजाचा विकास म्हणजे कुटुंबाचा विकास होतो. पर्यायाने राज्याचा विकास होतो. जनजागृतीच्या माध्यमातून तरुणांना दारु व अन्य पदार्थाच्या व्यसनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. व्यसनाधिन व्यक्तीचे प्रबोधन करुन अशा वाईट सवयींपासून  त्यांना दूर ठेवावे.  तंबाखू व दारु सेवनाने नाक, घसा, डोळे, मेंदू निष्क्रीय होवून कॅन्सरसारखे अनेक आजार होतात. व्यसनाधिनता ही सामाजिक समस्या असल्याने  त्याचा त्रास कुटुंबातील महिला व मुलांना सर्वाधिक होतो.
     प्रा. जर्रा काझी म्हणाले की, तरुणांनी आपल्या कर्तृत्वाच्या क्षमता वाढवून देश प्रगतीच्या कार्यात योगदान दयावे.
             प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिनगिरे यांनी करुन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व महात्मा गांधी व्यसममुक्ती सप्ताह आयोजनामागील भुमीका स्पष्ट केली.     कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिरिक्त जिल्हाधिकारी जे. टी. पाटील व जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान कै. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.    या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आनंद रामटेके यांनी केले तर आभार नेहरु युवा केंद्राचे मोहन गोस्वामी यांनी केले. 
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिरिक्त जिल्हाधिकारी जे. टी. पाटील व जि. प. चे समाज कल्याण  अधिकारी मिनगीरे यांनी व्यसनमुक्ती दिंडीस हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. ही दिंडी छत्रपती शिवाजी चौक - जि. प. मार्ग ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारतपर्यंत काढण्यात आली. या दिंडीत विविध  सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था, भजनी मंडळ, व्यसनमुक्ती कलापथके, नशाबंदी मंडळे आदि या दिंडीत सहभागी झाले होते. या दिंडीत महापुरुषांचे व्यसनमुक्तीचे संदेश, दुष्पपरीणाम दर्शविणारे पोस्‍टर्स लक्ष वेधून घेत होते.
    दुसऱ्या सत्रात  प्रभाकर लोंढे, बालाजी भातलवंडे, कुंदन कांबळे, डॉ.भागवत राऊत आदिंनी व्यसनमुक्तीवरील मनोगत व्यक्त केली.  नाना  देशमुख यांनी व्यसनमुक्तीवरील कवितांचे सादरीकरण केले.      
 
Top