उस्मानाबाद – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटाची चळवळ वाढविण्याच्या आणि त्या माध्यमातून महिलांचा आर्थिक आधार सबळ करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या आवारात आद्या दीपावली महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बचत गटातील महिलांची उमेद वाढावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  महसूल विभागातील सर्व महिला अधिकारी आणि कर्मचारी यांना या आद्या दीपावली महोत्सवाला भेट देण्याचे आणि बचत गटांकडून खरेदी करण्याचे आवाहन केले.
    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि महाराष्ट् राज्य जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून आजपासून आद्या दीपावली महोत्सव सुरु झाला. त्याठिकाणी दीपावलीत प्रत्येक कुटुंबाला लागणाऱ्या पणती, आकाश कंदील, चकली, चिवडा, लाडू, शेव, फराळाचे विविध पदार्थ, रांगोळी, खवा, पेढा, आवळा कॅंडी, विविध मसाले, कपडे, ज्वेलरी, पुजेचे साहित्य, शोभेच्या वस्तू आणि विविध खाद्य पदार्थ या महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांनी विक्रीसाठी ठेवले आहेत.
    या महिलांना आणि त्यांच्या बचत गटांना आर्थिक बळ देण्यासाठी प्रत्येकाने किमान काही वस्तू या बचत गटांकडून खरेदी कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी  केले आहे. याशिवाय, प्रत्येकाने त्यांचे मित्र, नातेवाईक यांनाही या बचत गटाच्या प्रदर्शनाला आवर्जून भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
    यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रुपाली सातपुते यांनीही सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांना सहकुटुंब या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन केले.                     
   



 
Top