बार्शी (मल्लिकार्जून धारूरकर) गेल्या वीस वर्षात केलेली लोकसेवा आणि भारतीय जनता पक्षाची उमेदवारी यामुळे गेल्या तेरा दिवसात शहर आणि ग्रामीण भागात बार्शीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून माझा विजय निश्‍चित आहे. असा आत्मविश्‍वास भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीचे उमेदवार राजेंद्र मिरगणे यांनी प्रचार संपल्यानंतर व्यक्त केला. यावेळी मिरगणे म्हणाले,जन्मभूमी आणि कर्मभूमी बार्शीच्या सार्वजनिक जीवनात गेली वीस वर्षे सामाजिक कार्याच्या माध्यमातून सक्रीय आहे. गेल्या तीन वर्षात तालुक्यामध्ये विविध लोकोपयोगी उपक्रमराबविले आहेत. त्याचबरोबर प्रस्थापित सत्ताधारी आणि विरोधक यांचे राजकारण सर्वसामान्य बार्शीकराने अनुभवले आहे. तालुक्यात काळानुरूप विकास झाला नाही. जलसिंचनाचे प्रमाण वाढले नाही. पिण्याचे पाणी आणि शेतीचे पाणी याबाबत कसलेही दूरगामी नियोजन झाले नाही. युवकांच्या हाताला कामदेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणे आवश्यक होते. परंतु तालुक्यात औद्योगिकरण वाढले नाही. मोठ्या उद्योगांना पायाभूत सुविधा मिळवून देण्याची इच्छाशक्ती कोणत्याही सत्ताधार्‍यांनी दाखविली नाही. त्यामुळे मोठे उद्योगसमूह बार्शीमध्ये आले नाहीत. त्याचबरोबर तालुक्यात नोकरी आणि उद्योग करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची प्रबळ इच्छा मनात असलेल्या हजारो महिला आहेत. परंतु त्यांच्या हातानाही कामदेण्याबाबत कसलीही दूरदृष्टी सत्ताधार्‍यांनी दाखविली नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक महिला पदाधिकारी निवडून आल्या. परंतु त्या शोभेच्या बाहुल्या राहिल्या. त्यांच्या रुपाने महिलांचे खरे प्रतिनिधीत्व झाले नाही. त्यामुळे महिला वर्गामध्येही सत्ताधार्‍यांच्याबद्दल मनामध्ये कमालीचा असंतोष आहे. त्यामुळे युवा शक्ती आणि महिला यावेळी सत्ताधार्‍यांना नाकारतील. केवळ निवडणूकांपुरते जनतेचे लांगुलचालन करायचे आणि धनशक्ती व मनगटशाही वापरून मतदान मिळवायचे असे दुहेरी तंत्र वापरून आजपर्यंत मते मिळविली गेली. वेगवेगळ्या जातीच्या, समाजाच्या मोजक्या पुढार्‍यांना हाताशी धरून अल्पसंख्यांक समाज मुठीत ठेवण्याचे कौशल्य आजपर्यंत सत्ताधार्‍यांना साधले होते. परंतु आता या तथाकथित पुढार्‍यांना डावलून समाजामध्ये जागृती निर्माण झाली आहे. आपल्या हिताची कळकळ असणारे नेतृत्व कोणते आणि निवडणूकांपुरते आपल्याला खोटी आश्वासने देणारे नेतृत्व कोणते आहे, यातला फरक जनतेच्या लक्षात आला आहे. त्यामुळे बार्शीकर यावेळी विचारपूर्वक मतदान करतील त्यांनी आजपर्यंत बार्शीतल्या सत्ताधार्‍यांचा खुर्चीसाठी चाललेला खेळ आणि त्यामुळे झालेला विकासाचा खेळखंडोबा पाहिला आहे. बार्शीकरांनी गेल्या तीन वर्षात माझ्या मित्र मंडळाने केलेली सेवाभावी कामे पाहिली आहेत. दुष्काळात मोफत टँकरने पाणी पुरविण्याचे कार्य केले. तेंव्हा माझ्याबद्दल असलेला आदरभाव ग्रामीण भागात कायमआहे, हे प्रचारसभांमधून जाणवले तसेच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी मोफत बियाणे वाटप केले. त्यामुळे शेतकर्‍यांना खरा कैवारी कोण? हे बार्शीकरांना कळाले आहे. शेतकर्‍यांना सहकारी संस्थांच्या माध्यमातून झालेली अडवणूक आणि पिळवणूक माहित आहे. त्याचबरोबर सहकारी साखर कारखाना कसा लयास गेला हे त्यांनी पाहिले आहे. याउलट चांगल्या कामांना मदत करण्याचे माझे धोरण आहे. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या शैक्षणिक संस्थेच्या नियोजित प्रकल्पांना मदत करण्याची माझी तयारी आहे. त्याचबरोबर गावागावातल्या सार्वजनिक समस्या कायमआहेत. साध्या मूलभूत सुविधासुद्धा मिळत नाहीत. गावांना जोडणारे रस्ते खराब आहेत. पाणीपुरवठ्याच्या योजना फसलेल्या आहेत. शहरात आणि ग्रामीण भागातही घाणीचे साम्राज्य आहे. नुसता विकास निधीचा गाजावाजा केला जातो. प्रत्यक्षात मात्र जनतेच्या पदरात कांहीच पडले नाही. तालुक्यातील आजी-माजी आमदारांचे अर्थकारणात गुंतलेले राजकारण बार्शीकरांनी पाहिले आहे. हे दोन्ही राजकारणी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे बार्शीकरांचा त्यांच्याबद्दल भ्रमनिरास झाला आहे. आता बार्शीकर फसणार नाहीत. गेल्या चार निवडणुकांमध्ये बार्शीकरांनी खोटी आश्वासने आणि दिलेल्या भूलथापा पाहिल्या आहेत. याउलट मी केलेल्या कामांच्या आधारे निवडणूक लढवतोय. मतदारांच्या प्रबोधनावर माझा भर आहे. लोकांसाठी मी घामाच्या कमाईतून समाजसेवा केली. हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे सर्वच स्तरातील बार्शीकरांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवली. नियोजनबद्ध प्रचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे देशभक्त नेतृत्व आपल्याला प्रगतीपथावर नेऊ शकते याची खात्री सर्वांना आहे. यामुळेही माझ्यावर मोदींच्या विचारांचा वारसदार म्हणून विश्वास टाकतील. केंद्रातील सरकारच्या विकासनिधीशी नाळ जोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत देणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन बार्शीकर मतदान करतील असे मला वाटते.

 
Top