उस्मानाबाद - गेल्‍या अनेक दिवसापासुन  दढी मारलेल्‍या   वरुण राजाने मंगळवार रोजी जिल्ह्यात  रिमझिम पावसाने हजेरी लावली. भूम तालुका वगळता जिल्ह्यात सर्वच ठिकाणी  पाऊस झाला. त्यामुळे शेतक-यांना कांहीसा दिलासा मिळाला आहे.
पावसाळा सुरु झाल्यानंतर दोन महिने पावसाने ओढ दिली होती. परंतू गणरायाच्या आगमनाबरोबर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणी पातळी वाढली होती. शेतक-यांच्या उभ्या पिकांना मोठे जिवदान मिळाले आहे. जिल्ह्यातील विविध भागात सुरू असलेल्या पाणी टँकरही प्रशासनाकडून बंद करण्यात आले होते. पुन्हा पावसाने हुलकावणी दिल्याने परतीच्या पावसाकडे पुन्हा नजरा लागले होते. दि. ७ ऑक्टोंबर रोजी उस्मानाबाद, परंड्यात, तुळजापूर तालुक्यात अर्धा तास पावसाने हजेरी लावली. सध्या सर्वत्र सोयाबिन काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबिन काढत असताना अचानक झालेल्या पावसामुळे शेतक-यांची मोठी तारांबळ उडाली. तर कांही भागात थोड्या प्रमाणात काढलेल्या सोयाबिनचे नुकसानही झाले. उस्मानाबाद शहरात सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे दिवसभर सुर्यदर्शन झाले नाही. मोठ्या पावसाची अपेक्षा असतानाच शहरात अर्धा तास रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. भूम तालुका वगळता हा पाऊस सर्वत्र रिमझिम स्वरुपात झाला.
उमरग्यात अर्धा तास पाऊस
शहरासह ग्रामीण भागात ही अर्धा तास पावसाने कांही ठिकाणी हजेरी लावली.
यावेळी उमरगा शहरासह तुरोरी, आष्टा (ज), मळगी, मगजीवाडी, दगडधानोरा, मुळज, जकेकूर, चौरस्ठता आदी भागात अचानक पावसाने हजेरी लावली. सध्या शेतामधील सोयाबीन काढण्याची तयारी बळीराजा करत आहे. अचानक झालेल्या पावसाने शेतकरी, मजूरांची तारांबळ उडाली असून मजूर लोकांचेही पावसाने हाल केले. दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान अचानक अभाळ येवून वादळीवा-यासह पाऊस सुरु झाला. हा पाऊस ज्वारी, तूर, हरभरा या पिकांच्या पेरणीसाठी पोषक असल्याचेही शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
रब्बीच्या पेरणीस विजया दशमीनंतरच्या काळात हरभरा, करडी, ज्वारी पेरणीस शेतकरी लगबग करीत असतो. त्यासाठी जमिनीत ओल राहणे हे ही तितकेच महत्वाचे असते. रब्बीचे पिक उगवण्यास या पावसाने चांगली मदत होते. परंतू सोयाबीन काढून जमिनीवर टाकल्याने पावसामुळे मोडके उटून नासाडीही होते. त्यामुळे या मोसमातील पावसाचा कांही शेतक-यांना फायदा तर कांहीना नुकसानही सहन करावे लागते. आर्धा तास झालेल्या या पावसामुळे रब्बीची पेरणी करण्यासाठी जमिन भुसभूसीत ओली झाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

 
Top