तुळजापूर : बेळगावच्‍या प्रचारसभेला गेल्यानंतर त्याठिकाणी एका मतदारसंघात ८५ उमेदवार निवडणूक लढवत होते. त्यामुळे निवडणूक चिन्ह शिल्लक राहिले नाही. कुणी घोडं, कुत्रं तर कुणी मांजराचे चिन्ह घेतले. चिन्हांच्या यादीत वस्ता-याचाही समावेश होता. मात्र, तेथील मतदारांनी योग्य उमेदवाराची निवड केली. यावेळी राज्यात अनेक पर्याय मतदारांसमोर असल्‍याचे सांगुन जनतेनी राष्‍ट्रवादी पक्षाच्‍या उमेदवारास निवडुन देण्‍याचे आवाहन  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तुळजापूरात केले. 
      तुळजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिवनराव गोरे यांच्या प्रचारार्थ येथील हडको मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा विद्याताई चव्हाण, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, राणाजगजितसिंह पाटील, उमरगाचे उमेदवार संजय गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, महेंद्र धुरगुडे, दिपक आलूरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 
यावेळी बोलताना शरद पवार यांनी काँग्रेससह भाजपावर चांगलाच हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आम्ही केलेल्या विकास कामाचे श्रेय काँग्रेसवाले घेत असुन केंद्रात मोदींना सत्ता दिली. मोदी जर मोदी लाट असती तर नरेंद्र मोदी यांना केंद्रातली कामे सोडून महाराष्ट्रात २२ सभा घेण्याची काय गरज? याचा अर्थ यांना सत्तेचा हाव सुटला आहे. शेतक-यांच्या मालाला सध्या भाव मिळत नसुन शेतकरी संकटात चालला असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. तसेच आम्ही दोन रू. किलो गहू, ३ रू. किलो तांदूळ देऊन गरीबाच्या घरी चुली पेटविल्या. 
     यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनीही महिलांना ५० टक्के आरक्षण शरद पवार यांच्यामुळेच मिळाले असल्याचे सांगितले. तसेच भाजपावर त्यांनी जोरदार टिका केली. यासभेमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार जिवनराव गोरे, माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, नरेंद्र बोरगावकर आदिंची भाषणे झाली. या सभेसाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 
 
Top