उस्मानाबाद - सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून 27 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात येतो. त्याचा शुभारंभ आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय कार्यालयात करण्यात आला. भ्रष्टाचारनिर्मूलनाची शपथ आज विविध कार्यालयात घेण्यात आली तसेच राज्यपालांच्या संदेशाचेही यावेळी वाचन करण्यात आले.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सर्वांना भ्रष्टाचारनिर्मूलनाची शपथ देण्यात आली. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, उपजिल्हाधिकारी सर्वश्री अरविंद लाटकर आणि शिल्पा करमरकर, तहसीलदार शिवकुमार स्वामी  व राजश्री मोरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी श्रीमती करमरकर यांनी यावेळी शपथेचे वाचन केले. तहसीलदार स्वामी यांनी राज्यपालमहोदयांच्या संदेशाचे वाचन केले.
    विविध विभाग, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, संस्था, संघटना, बॅंका आदींनी या कालावधीत बॅनर्स, पोस्टर्सद्वारे जागृती करावी, वादविवाद स्पर्धा आयोजित कराव्यात, विद्यार्थी तसेच शाळांसाठी निबंधलेखन, व्याख्याने आयोजित करावीत. याशिवाय, सार्वजनिक क्षेत्र, स्थानिक संस्था यांनी भ्रष्टाचारविरोधी प्रतिज्ञा त्यांच्या कार्यालयात सर्व संबंधितांना द्याव्यात, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक अश्विनी भोसले यांनी केले आहे. 
 
Top