मुंबई -:  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे निवडणुकीनंतर एकत्र येण्याच्या शक्यतेला बळ देणा-या घटना सध्या राजकीय वर्तुळात घडत आहेत. कारण आतापर्यंत नरेंद्र मोदींवर थेट टीका न करणाऱ्या या दोन्ही चुलत बंधूंनी कालपासून त्यांच्यावर थेट प्रहार करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय पक्ष नको, प्रादेशिक पक्षांना बळ द्या अशी साद हे दोन्ही बंधू घालत आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं बोललं जात आहे.
      काल मुंबईत झालेल्या सभेत राज ठाकरे आणि विदर्भात झालेल्या सर्वच सभांमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. चिखलीमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी ममता, जयललिता आणि मायावती यांना मिळालेल्या सत्तेप्रमाणे स्थानिक पक्षांना कौल देण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.
      तर मुंबईत झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरातधार्जिण्या धोरणावर जोरदार टीका केली. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकाच वेळी नरेंद्र मोदी यांच्यावर सुरु केलेली टीकेची मालिका हा निव्वळ योगायोग नसल्याचं राज्यातील राजकीय जाणकारांना वाटतं आहे.
         त्यात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे मनसेवर चकार शब्दही काढत नाहीत. त्यामुळे आता नरेंद्र मोदींच्या विरोधाच्या निमित्ताने तरी राज आणि उद्धव एकत्र येणार का हे पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
       मुंबईतील कांदिवलीतील सभेत राज ठाकरे म्हणाले होते की, मला माहिती होती की भाजप सेनेला दगा देणार आहे. राज यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेबद्दल सहानुभूती मिळत असल्याचंही बोललं जात आहे तसंच महाराष्ट्रातील मोठे नेते या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही बोललं जात आहे.

साभार - एबीपी माझा
 
Top