बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) कुर्डूवाडी रस्त्यावरील झालेल्या भांडणानंतर अभियंता अमित इंगोले यास पोलिस ठाण्यात नेऊन केलेल्या अमानुष मारहाणीप्रकरणी जखमींनी न्यायालयात दाद मागीतली होती. त्यावर न्यायाधिश भागवत झिरपे यांच्या न्यायालयाने दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती तक्रारदार इंगोले यांनी दिली.
    याबाबत अधिक माहिती अशी, अभियंता अमित इंगोले व गुळपोळी येथील तरुणांमध्ये वाहनाची धडक देऊन निघून जाण्याच्या कारणावरुन भांडण सुरु होते. सदरच्या प्रकारानंतर पोलिस अभिमान गाटे यांनी तेथून जातांना मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस गाटे व अभियंता इंगोले यांच्यामध्ये शाब्दीक चकमक झाली. सदरच्या प्रकारानंतर पोलिस गाटे यांनी त्यांच्या सहकारी पोलिसांना बोलावून इंगोले यास बार्शी पोलिस ठाण्यात नेले व त्या ठिकाणी बंद खोलीत अमानुष मारहाण केली. सदरच्या प्रकारानंतर सामाजिक संघटना, अभियंता संघटना व प्रतिष्ठित नागरिकांनी पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांच्याकडे सदरचा प्रकार सांगीतला. सदरच्या प्रकारावर चाऊस यांनी दिलगीरी व्यक्त केली व पोलिसांकडून काही चूक झाली असेल तर त्यांच्या वतीने मी माफी मागतो असे सांगून तक्रारदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तक्रारदार इंगोले यांच्या वडिलांनी आम्हाला पोलिसांविरोधात तक्रार दाखल करायचीच आहे, माझ्या मुलास अमानुष मारहाण झाली असे सांगीतले. वैद्यकिय अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करुन इंगोले यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला.
    इंगोले यांच्या तक्रारीनुसार न्यायालयाने पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत गाटे, सोमनाथ गडदे व सहा.पोलिस निरीक्षक अभिषेक डाके यांच्यावर गुन्हा दाखल करुन सदरच्या फिर्यादिचा तपास इतर त्रयस्त पोलिस अधिकार्‍यांकडे देण्यात यावा असे आदेश दिले. इंगोले यांच्या वतीने अॅड शाम झालटे, अॅड.औदुंबर कोल्हाळे, अॅड .भगवंत पाटील यांनी काम पाहिले.
 
Top