उस्मानाबाद - जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रअंतर्गत  सुरु असलेल्या कामास तात्काळ गती देवून रोहयोची कामे वेळेत पुर्ण करावीत. कामात हयगय व कर्तव्यात  कसूर  करणाऱ्याविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे बोलत होते.
  या बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रुपाली सातपुते, उपनिवासी उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीरंग तांबे, रोहयोचे श्री. चव्हाण, श्री. माने,  सर्व उपजिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व कार्यालय प्रमुख,अधिकारी, अधीक्षक  अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, गटविकास अधिकारी, आदि विविध यंत्रणेचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, यंदा पाऊस कमी पडल्याने टंचाईसदृष्य  परिस्थिती निर्माण झाल्याने मजूर व शेतमजूरांना रोहयोच्या माध्यमातून नवीन कामे सुरु करुन त्यांना तातडीने रोजगार उपलब्ध करुन दयावेत, रोहयो अंतर्गत अपूर्ण तातडीने पुर्ण करावीत. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी रोजगार सेवकांचा कामाचा आढावा घ्यावा. जे रोजगार सेवक कामात कसूर करतील त्यांचेविरुध्द कार्यवाही करावी.
डॉ. नारनवरे म्हणाले की,. येत्या 15 दिवसात रोहयोच्या कामावर  10 हजार मजूरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे उदिदष्ट दिले असल्याने प्रत्‍येक तालुक्याने किमान 1 ते दिड हजार मजूरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रोहयोच्या मजूरांना काम केल्यानंतर  तात्काळ मंजूरी दयावी. त्यांचे हजेरीपट नियमित भरावीत, नियमीत कामकाजाचा आढावा घ्यावा,  रोजगाराअभावी एकही मजूर वंचित राहता कामे नये, नरेगाच्या हेल्पलाईवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तहसीलदार व गटविकास  अधिकाऱ्यांनी  स्थानिक पातळीवर तात्काळ निवारण करावे. रोहयोची कामे वेळेत होत नसतील तर तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना आपल्या अधिकाराचा वापर करावा. असे निर्देश डॉ. नारनवरे यांनी सर्व यंत्रणेला दिले.       
     प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 3 हजार 730 कामे सुरु असून त्यापैकी 1 हजार 45 कामे पुर्ण झाली आहेत. वैयक्तिक शौचालयाची 6 हजार 386 कामास मान्यता असून त्यापैकी 939 कामे सुरु असल्याची माहिती  दिली.
    या बैठकीत पाटबंधारे  विभाग, लघु पाटबंधारे विभाग, मध्यम प्रकल्प, उपसासिंचन प्रकल्प मजबुतीकरण, सीना कोळेगाव प्रकल्प, लघु सिंचन (जलसंधारण), ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी, वन, सामाजिक वनीकरण आदि 15 यंत्रणेअंतर्गत सुरु असलेल्या रोहयोच्या कामाचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
 
Top