उस्मानाबाद -  जिल्ह्यात अवैध सावकारीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना वेठीस धरणा-या सावकारांवर आता जिल्हा प्रशासन नजर ठेवून असणार आहे. अशा पद्धतीने सावकारी करणा-यांची माहिती सहकार विभागाने येत्या 3 दिवसांत द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात अवैध मार्गाने सावकारी सुरु ठेवून सर्वसामान्यांना नाडणा-या असा व्यक्तींची तालुकानिहाय माहिती घेऊन त्यांनी केलेल्या व्यवहारांचीही चौकशी करण्याचे निर्देश डॉ. नारनवरे यांनी  जिल्हा उपनिबंधक (सहकार) यांना दिले आहेत. सहकार विभागातील तालुकास्तरीय अधिका-यांनी त्यांच्या अधिकारांचा योग्य वापर करावा, असे त्यांनी सुनावले.
अवैधरित्या सावकारीच्या तक्रारी सहकार विभागाकडे आल्या असतील तर संबंधित व्यक्तींची सर्व पार्श्वभूमी तपासा, त्याने केलेल्या खरेदी व्यवहारांची माहिती घ्या, संबंधितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याची माहिती पोलीस विभागाकडून घ्या, असे त्यांनी सांगितले.
सहकार विभागाकडे याप्रकरणी  99 तक्रारी आल्या आहेत. त्यात एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. उर्वरित प्रकरणांची पुनर्तपासणी करण्याचे आदेश डॉ. नारनवरे यांनी दिले. जिल्ह्यात ज्यांचा सावकारी परवाना आहे, अशा संबंधितांची बैठक घेऊन त्यांना नवीन सावकारी कायद्याची माहिती द्या. या कायद्याचे उल्लंघन करणा-यावर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी सहकार विभागाला दिले.
अनेक शेतकरी, विद्यार्थी यांनी बॅंकांकडून अडवणूक होत असल्याच्या तक्रारी सहकार विभागाकडे केल्या होत्या. त्यावर काय कार्यवाही केली, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिले.  ज्या ज्या बॅंकांविरुद्ध संबंधित शेतकरी, विद्यार्थी यांनी तक्रारी केल्या आहेत, अशा बॅंक शाखांबाबत सहकार विभागाने काय कार्यवाही केली, याचा अहवालही त्यांनी मागितला आहे.  याशिवाय, सहायक निबंधकांनी येत्या 17 तारखेपर्यंत कोणत्याही दोन संस्था तपासून त्यांचा अहवाल द्यावा. महिना अखेरपर्यंत प्रत्येक सहायक निबंधकाने 10 संस्थांची तपासणी करावी. यापुढे दरमहिना 10 संस्थांची तपासणी करुन तेथील कारभाराबाबतचा लेखी अहवाल जिल्हा उपनिबंधकांमार्फत जिल्हा प्रशासनाला द्यावे, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा उपनिबंधक (सहकार) एस.पी. बडे, तालुकास्तरीय सहायक निबंधक उपस्थित होते.
 
Top