बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) इंग्रजांच्या राजवटीत कार्यरत झालेल्या बार्शी टाऊनची नॅरोगेज रेल्वे कोळशाच्या इंधनावरील धावत होती. स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे बार्शी लाईट नावाने प्रसिध्द छोटी रेल्वे रुळावरुन अविरतपणे धावत राहिली. तत्कालिन बार्शी शहराची लोकसंख्या विचारात घेत केलेल्या सोयी सुविधांच्या रेल्वेची गरज वाढल्याने नव्याने ब्रॉडगेज अथवा मीटरगेज अशा रेल्वेची सोय ही गरजेची झाली.
    दूरदृष्टी असलेला नेता म्हणून परिचित तत्कालित मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी लातूरच्या विकासाकरिता रेल्वेची गरज ओळखून युध्दपातळीवर काम सुरु केले व कडेला नेले. लातूर शहराच्या गरजेसाठी केलेल्या कामाचा उपयोग बार्शीकरांना झाला व बार्शी शहरातील रेल्वे सुविधांचे नूतनीकरण झाले. नव्याने येणार्‍या रेल्वेचा मार्ग काहीसा बदलल्याने बार्शीतील मध्यवस्तीतून जाणार्‍या रेल्वेचा त्रास कमी झाला.
    नवीन रेल्वे लाईन झाल्यानंतर जुन्या रेल्वेलाईनचे रुळ काढून रेल्वे विभागाने त्यांच्या ताब्यात घेतले. परंतु त्या जागी तयार करण्यात आलेल्या माती व मुरुम दगडाचे ठिक त्या ठिकाणीच राहिले. शहरातून असलेल्या रस्त्याच्या कडेचा हा जुना रेल्वेमार्ग असल्याने त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात देऊन रस्त्यांचा विकास करणे गरजेचे होते. त्यानुसार काही कालावधीनंतर बांधकाम विभागाकडे सदरची जागा हस्तांतरीत करण्यात आली परंतु या प्रक्रियेत बराच कालावधी वाया गेल्यामुळे पत्र्याच्या घरांनी व टपरीधारकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करुन वहिवाट सुरु केली.   
    काही वर्षांपूर्वी बार्शी नगरपरिषदेत प्रशिक्षीत मुख्याधिकारी म्हणून रुजू झालेल्या तुकाराम मुंढे यांनी बार्शी शहरातील अतिक्रमणे काही प्रमाणात हटविल्यानंतर अतिक्रमण करणार्‍यांच्या मनात धडकी भरली होती. तुकाराम मुंढे यांच्या कामावर सर्वसामान्य नागरिक भलतेच खूश झाले होते व त्यांच्या मनात मुंढेच्या प्रामाणिक कामाबद्दल आदर निर्माण झाला होता. मुंढे यांच्याकडून आणखी बरीच मोठ्या धेंडांची अतिक्रमणे निघणार असल्याचा गाजावाजा झाल्याबरोबर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. वाडी रस्त्यावरील जुन्या रेल्वेचा मार्ग निघाल्यानंतर बार्शी नगरपरिषदेच्या वतीने ज्या रस्त्यांना मुख्य रस्त्याशी जोडता येते त्या ठिकाणी जुन्या रेल्वे मार्गातील मातीचे ढिक काढून रस्ते जोडले व त्या ठिकाणी डांबरी रस्त्याचे जोड दिले त्यामुळे शहरातील अनेक मार्गावरील वाहतुकीची समस्या कमी करण्यात यश मिळाले व नागरीकांचीही चांगली सोय झाली होती.
    जुन्या रेल्वे लाईनवर मोठ्या प्रमाणात टपर्‍या व घरे थाटून अनेकांनी विविध छोटे-मोठे व्यवसाय सुरु केले तर अनेकांनी टपर्‍यांचा बाजार करुन मोठ्या किमतीला ते इतरांना विकून टाकल्या. शासनाची जागा बेकायदेशीर ताब्यात घेऊन केलेल्या अतिक्रमणांवर लाखो रुपयांचे व्यवहार झाले परंतु त्याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष दिले नाही. अशा प्रकारच्या अतिक्रमणांमुळे त्याला नजीक असलेल्या अनेक मालमत्ताधारकांनी लेखी तक्रारी दिल्या आहेत परंतु त्या तक्रारींना आजतरी केराची टोपली दाखविण्यात आली आहे. आणखी काही दिवस तक्रारीची दखल न घेतल्यास आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. सद्यस्थितीत जुन्या रेल्वे लाईनची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री बळी यांना याबाबत विचारणा केली असता मला त्यातील काही माहीत नाही, तो विषय आपल्या अखत्यारीत येत नाही असे उडवाउडवीचे उत्तर दिले.
    स्थानिक नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी अथवा तहसिलदार यांनी याकडे लक्ष घालण्याची गरज होती, परंतु राजकारणी व्यक्तींच्या भिती व त्रासामुळे त्यांनीही लक्ष दिले नाही. तर काही बाबतीत त्यांचे वाईट अनुभव हे त्याला कारणीभूत ठरले. त्यापैकी अत्यंत गाजलेला प्रसंग कुर्डूवाडी रोडवरील अतिक्रमण असलेल्या एका पत्र्याच्या घराखालून सार्वजनिक गटार ही पूर्वीपासूनच गेली होती. आजूबाजूच्या नागरिकांच्या तक्रारीनुसार त्याची दुरुस्ती नगरपरिषदेने हाती घेतली परंतु यावेळी अतिक्रमण केलेल्या पत्र्याच्या घराला धक्का लागला याचे राजकिय भांडवल विरोधकांकडून झाल्याने नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यासह इतर अधिकार्‍यांवर ऍट्रासीटीसह गुन्हे दाखल झाले व शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या अनुभवामुळे सार्वजनिक आणि अत्यावश्यक कामात आलेल्या अनुभवामुळे बार्शी नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी पुन्हा अतिक्रमण हटविण्याचे नावच घेतले नाही.
    सक्षम अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेल्या उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम यांनी सोलापूर जिल्ह्याचा पदभार स्विकारल्यानंतर बार्शीकरांच्या अपेक्षा बळावल्
या होत्या. त्यांच्याकडून बार्शी शहराचा चांगला विकास होण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी नागरिकांना मोठी आशा होती. परंतु उस्मानाबादला पास झालेले जिल्हाधिकारी बार्शी शहराच्या बाबत नापास झाल्याचे विविध प्रसंगी दिसून आले. त्यांच्या जागी नूतन जिल्हाधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची वर्णी लागली. मुंढे यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे त्यांची कारकिर्द प्रत्येक ठिकाणी गाजली आहे. सध्या निर्माण झालेली गरज व बार्शी शहरातील अतिक्रमण विरोधी मोहिम ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अथवा त्यांच्या उपस्थितीत राबविल्यास चांगल्या प्रकारे कायद्याचा धाक निर्माण होईल. तसेच यापुढे कोणीही शासनाच्या जागेचा दुरुपयोग अथवा बळजबरी कबजा करण्याचा प्रयत्न करणार नाही असा आत्मविश्वास नागरिकांत निर्माण झाला आहे.
 
Top